शिवस्मारक व ‘भीमपार्क’ उभारण्यासाठी पर्यटन विभागाकडून २० एकर जागेला तत्वतः मंजुरी
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश
सोयगाव (विवेक महाजन) जगप्रसिद्ध अजिंठा लेणीच्या पायथ्याशी जागतिक पातळीवर उभारण्यात येणाऱ्या “शिवस्मारक व भीमपार्क” स्मारकासाठी फर्दापूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने शिवस्मारक साठी १० व भीमपार्क साठी १० एकर जागेला तत्वतः मान्यता दिली आहे. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून पर्यटन विभागाने जागा मंजूर केल्यानंतर फर्दापूर येथे स्मारक निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
फर्दापूर येथे साकारण्यात येणाऱ्या शिवस्मारक व भीमपार्क संदर्भात यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत शिवस्मारक उभारण्यासाठी पहिल्या टप्यात २५ कोटी तर सामाजिक न्याय विभागाकडून भीमपार्क उभारण्यासाठी पहिल्या टप्यात १५ कोटींच्या निधीला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार फर्दापूर येथे जागतिक पातळीवरील स्मारक उभारण्यासाठी पर्यटन विभागाला प्रस्ताव पाठविण्यात आला होता. आता यासाठी पर्यटन विभागाने जागा उपलब्ध करून देण्यास तत्वतः मान्यता दिल्याने शिवस्मारक व भीमपार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तातडीने अहवाल सादर करा
शिवस्मारक व भीम पार्कच्या मूलभूत संरचनेविषयी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना प्राधिकृत केले आहे. त्यांनी आर्किटेक्चर,एस्स्टमेट, डिझाईन याबाबत योग्य कन्सलटंसी नेमावी. यामध्ये तज्ज्ञांची नेमणूक करावी जेणे करून जागतिक पातळीवरील प्रकल्प होईल. याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परिपूर्ण प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव 15 फेब्रुवारी पर्यंत सादर करावा जेणेकरुन सदरचे काम यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करता येईल असे निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
अजिंठा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी सुमारे ६७ देशांमधून लाखो पर्यटक लेण्या पाहण्यासाठी येतात. त्यांना रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काय आहेत ते जगाला कळावे. नवीन व भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख व्हावी यासाठी फर्दापूर येथे जागतिक पातळीवर स्मारक उभारण्याचे माझे स्वप्न होते. यासाठी जागा मिळविणे मोठे आव्हान होते यासाठी पर्यटन विभागाने जागा देण्यासाठी तत्वतः मान्यता दिल्याने जागेचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्याहस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यासाठी लवकरच भेट घेणार असल्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.