भरधाव कारचा भीषण अपघात ; चार तरुणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
विजापूर (प्रतिनिधी) सोलापूर महामार्गावर सोलापूरनजीक पुलाच्या कठड्यावर कार आदळून घडलेल्या अपघातात चार तरूणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला. कर्नाटकातील सिंदगी (जि. विजापूर) येथील पाच तरूण कारने पुण्याकडे जाण्यासाठी निघाले होते. सोलापूर-विजापूर महामार्गाचे चौपदरीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतूक भरधाव वेगात असते. एके ३२ एन २४८४ क्रमांकाची कार भरधाव वेगात सोलापूरच्या दिशेने येत असताना कवठेगावाजवळ नवीन बाह्यवळणावरील पुलाच्या कठड्यावर जोरात आदळली.
या आपघातात अरूण कुमार लक्ष्मण (वय २१), महिबूब मोहम्मद अली मुल्ला (वय १८), फिरोज सैफनसाहेब शेख (वय २०) आणि मुन्ना केंभावी (वय २१) या चौघा तरूणांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एक तरूण जखमी झाला असून त्यास छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सलगर वस्ती पोलीस ठाण्यात या आपघाताची नोंद झाली आहे.