लोडशेडिंगचा निर्णय तात्काळ मागे घ्या, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो : खा. इम्तियाज जलील
परिस्थितीबाबत महावितरण अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी बैठक घेवुन सतर्क करावे
औरंगाबाद (वृत्तसंस्था) रमजानच्या पवित्र महिना सुरु असुन पूढे रामनवमी, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, महावीर जयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. अशा सणासुदीच्या काळात महावितरणने औरंगाबाद जिल्ह्यात अचानक लोडशेडिंग केल्यामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये संतापाची लाट उसळली असुन शासनाने तात्काळ लोडशेडींगचा निर्णय मागे घ्यावा अन्यथा कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची आशंका खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली आहे. काहीही अनुचित प्रकार घडु नये म्हणून महावितरणच्या अधिकाऱ्यांची तात्काळ संयुक्त बैठक घेवुन त्यांना परिस्थितीबद्दल सतर्क करण्याचे पोलीस आयुक्त निखील गुप्ता व ग्रामीण पोलीस अधीक्षक निमित गोयल यांना पत्राव्दारे कळविले.
खासदार जलील यांनी लोडशेडिंगचा निर्णय सरकारने कोणत्याही कारणास्तव घेतला असेल तर तो लवकरात लवकर मागे घेवुन जनतेला दिलासा देण्यात यावा असे महावितरणचे सहसंचालक मंगेश गोंदावले व मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांना पत्राव्दारे कळविले आहे.
खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले की, सर्वांना माहितीच आहे. जगभरातील मुस्लिमांसाठी रमजान हा पवित्र महिना असून ज्यामध्ये मुस्लिम बांधव दिवसा उपवास करुन प्रार्थना करीत असतात. हा एकमेव असा महिना आहे ज्यात सर्व प्रकारच्या व्यवसायांची भरभराट असते. दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे सर्व समाजातील नागरीकांनी आपआपला सण घरीच साजरा केला होता. मात्र आता सर्व प्रकारचे निर्बंध शिथिल झाले असुन सर्व प्रकारचे आस्थापना व बाजारपेठां खुले असल्याने आता सर्व धर्मातील नागरीकांना आपआपले सण उत्साहात साजरे करायचे आहे.
रमजान सण सुरू होताच महावितरणने लोडशेडिंग सुरू केले आहे हे लक्षात घेणे गरजेचे असुन घेतलेला निर्णय त्रासदायक आहे. रामनवमी, हनुमान जयंती, गुड फ्रायडे, महावीर जयंती आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अगदी जवळ आली असुन आपल्या सर्वांनाच माहित आहे की, उत्सव आणि जयंती अत्यंत महत्वपुर्ण असुन मोठ्या उत्साहात साजरी केले जाते. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यात दररोज तासनतास वीज खंडित होत असल्याने लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भिती मला वाटत असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमुद केले आहे.
लोडशेडींगमुळे सर्वसामान्य नागरीक अस्वस्थ आणि आक्रमक होत आहेत परिस्थितीने उग्ररुप धारण करु नये, अशी आमची सर्वांची इच्छा असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.