शिंदखेडा येथील सेवानिवृत्त प्राध्यापकच्या घरी चार लाखांपेक्षा अधिकची धाडसी चोरी
शहरातील विविध ठिकाणी चोरीचे सत्र सुरूच
शिंदखेडा (यादवराव सावंत) शहरात काॅलनी परिसरातील घरे बंदचा फायदा घेत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दोन तीन दिवस होत नाही तोवर नवीन घरफोडी होत असुन पोलीसांना आवाहन देत आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला इंदिरा काँलनीतील सेवानिवृत्त प्राध्यापक व पत्रकार जी.पी.शास्री ह्यांच्या घरात कुलुप तोडुन सुमारे चार लाखांपेक्षा ऐवज चोरट्यांनी लंपास केली आहे. चोरीच्या घटनेमुळे काॅलनी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रा.शास्री हे गेल्या आठ दिवसांपासून परिवारासह बाहेर गावी गेले होते. त्यामुळे घर बंद होते. काल रात्री दोन ते चार वाजेदरम्यान घरफोडी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आत प्रवेश केल्यावर घरातील बैठक, बेडरूम, स्वयंपाक येथील सामान अस्ताव्यस्त केला. मागील बाजूला खोलीतून गोदरेज कपाट तोडुन रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकुण चार लाखांपेक्षा अधिक रक्कमेचा ऐवज लंपास केला आहे. शनिवारी सकाळी चोरी झाल्याचे शास्त्री यांच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर घटना उघडकीस आली. नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशी चोरट्यांनी धाडसी चोरी करीत पोलीसांना आव्हान दिले आहे. रात्री उशीरापर्यंत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
शहरासह तालुक्यात घरफोडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या आठवड्यात वरुळ रस्त्यालगत आशीर्वाद हाॅस्पिटल मागे देवसिंग गिरासे यांच्या घरात कुलुप तोडुन चोरी झाली होती. तेथील चोरीची पद्धत व ही चोरी सारखीच आहे. दरम्यान शास्त्री हे काल संध्याकाळी घरी आल्यावर चोरीचा उलगडा झाला.