नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे : अब्दुल सत्तार
कन्नड (विवेक महाजन) शहरात पायाभूत व मूलभूत सुविधा निर्माण करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहर वासीयांनी येत्या नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असे प्रतिपादन महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कन्नड येथील विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले. कन्नड शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देखील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली.
आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पुढाकाराने मंजूर कन्नड शहरातील 1 कोटी 21 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते शनिवार (दि.5) रोजी संपन्न झाले. यावेळी शहरात आयोजित सभेला मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते. यावेळी आमदार उदयसिंग राजपूत , जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि. प. उपाध्यक्ष केशवराव पा. तायडे, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, शहरप्रमुख सुनील पवार, शेख ख्वाजासेट, शेख जावेद सेट, सिल्लोड कृउबा समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, जि.प.सदस्य धनराज बेडवाल यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक डॉ. मनोज राठोड, राजेंद्र ठोंबरे, मारुती वराडे, नगरसेवक बंटी सुरे, काकासाहेब ठोकळ, सिल्लोडचे नगरसेवक विठ्ठल सपकाळ, शेख सलीम हुसेन, राजू गौर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कन्नड शहराच्या विकासासाठी जवळपास 17 कोटी रुपयांचा निधी दिला. आमदार उदयसिंग राजपूत यांच्या पुढाकाराने आज 1 कोटी 21 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन झाले. संयमी व कर्तव्यदक्ष आमदार उदयसिंग राजपूत यांच्यात विकास करण्याची धमक आहे. कन्नड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या निवडणुकीत शिवसेनेला एक हाती सत्ता द्या असे आवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.