शिंदखेडा येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्यामार्फत भगवा रॅलीचे आयोजन व हिंदू नववर्षाचे स्वागत
शिंदखेडा (यादवराव सावंत) शिंदखेडा येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती यांच्यामार्फत आज दिनांक २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी भव्य भगवा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

“चंदनाच्या काठीवर,शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी उभारली जाते गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो गुढीपाडवा हा भारतातील विशेषतः महाराष्ट्रात प्रमुख सण आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी व्यवसाय प्रारंभ नव्या उपक्रमाचा प्रारंभ सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात दारी उभारलेली गुढी हे विजयाचे समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. श्री स्वामी समर्थ केंद्र वरुळ रोड शिंदखेडा येथून डी जे च्या तालात या भव्य रॅलीची सुरुवात करण्यात आली. या रॅलीत शेकडो तरुणांनी सहभागी होऊन नववर्षाच्या स्वागतासाठी आतिषबाजी करून डी जे च्या तालावर आपली पाऊलेही थिरकवलीत. ती रॅली भगव्या चौकातून पुढे श्रीराम चौक, गांधी चौक, दक्षिण मुखी मारुती मंदिर भोई गल्ली येथे नवनिर्वाचित नगर पंचायत स्वीकृत सदस्य अरुण देसले यांच्या हस्ते गुढीची पूजा करून , बडगुजर गल्ली, देसाई गल्ली , रथ चौक, राजपूत गल्ली, माळी वाडा या मार्गाने जाऊन श्रीराम मारुती मंदिर, माळीवाडा येथे हनुमान व श्रीराम आरती करून समारोप करण्यात आली.




