किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियान कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय नारळ लागवड जनजागृती कार्यक्रम संपन्न.
ठाणे, शहापुर (भावेश ठाकरे) आझादी का अमृत महोत्सव विशेष किसान भागीदारी प्राथमिकता हमारी अभियानांतर्गत महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपुर संलग्न कृषि विज्ञान केंद्र, नागांव, ता. मुरबाड, जि. ठाणे व नारळ विकास मंडळ, राज्य केंद्र ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. सुरेश द. जगदाळे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख यांच्या मार्फत २८ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता कृषि विज्ञान केंद्राच्या आवारामध्ये “जिल्हास्तरीय नारळ लागवड व प्रक्रिया तंत्रज्ञान जनजागृती कार्यक्रम” संपन्न झाला.
या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना नारळ विकास मंडळाचे उपसंचालक, डॉ. अमेय देबनाथ यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये नारळ पिकाचे उत्पादन व प्रक्रिया तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. नारळ लागवड करताना नारळ पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचे व्यवस्थापन योग्यरित्या करण्याचे आवाहन केले. जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी रासायनिक खतांबरोबरच, सेंद्रिय व जैविकखतांचा वापर करावा, फुल व फळगळ थांबवण्यासाठी सूक्ष्मअन्नद्रव्याचा मुख्यत्वे पोटॅश व बोरॉनचा वापर केला पाहिजे, तसेच हिरवळीच्या खतांचा वापर पिकाच्या आजूबाजूला करावा जेणेकरून जमीनिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढावी असा सल्ला उपस्थित शेतकर्यांना दिला.
शेतकऱ्यांनी नारळाची रोपे ही अधिकृत रोपवाटीकेतूनच खरेदी करण्याचे आवाहन केले. त्याबरोबरच नारळापासून बनणाऱ्या विविध मूल्यवर्धित पदार्थांची माहिती दिली. नारळ बोर्डाचे प्रक्षेत्र अधिकारी शरद आगलावे यांनी नारळाच्या बुटक्या व उंच जाती आणि विविध योजनांची माहिती दिली. मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी ठाणे जिल्ह्यातील नारळ लागवड क्षेत्रातील समस्यांवर भर दिला व नारळ क्षेत्र वाढीसाठी लघु सिंचन कमांड भागातील पाटांच्या दुतर्फा नारळाची लावगड करून नारळ क्षेत्र वाढीला सुरुवात करावी असे आवाहन केले.
नामदेव धांडे, तालुका कृषि अधिकारी यांनी कृषि विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती दिली. रविंद्र उबाळे, भूकर मापक, भूमिअभिलेख, मुरबाड यांनी कृषि विज्ञान केंद्राद्वारे मुरबाड तालुक्यात नंदनवन फुलावे अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून नारळ वृक्षाचे पूजन केले.
कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, डॉ. सुरेश जगदाळे यांनी प्रास्ताविक सादर करून कृषि विज्ञान केंद्राद्वारे घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांबद्दल माहिती दिली. कृषि विज्ञान केंद्रातील विषय विशेषज्ञ(उद्यानविद्या), विशाल यादव यांनी नारळ लागवडी विषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी वृक्ष वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मयुर नवले यांनी तर आभार प्रदर्शन विशाल यादव यांनी केले. सदर कार्यक्रमास १५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.



