राज्यात पुन्हा अस्मानी संकटाची चाहूल, वादळी पावसाचा इशारा
काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता
मुंबई : येत्या गुरुवारी, 21 एप्रिल 2022 रोजी आणि शुक्रवारी, 22 एप्रिल 2022 रोजी राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. यात विदर्भ, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची दाट शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवार, 22 एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे. मात्र पालघर, ठाणे, मुंबई येथे कोरडे वातावरण आढळून येईल.तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. गुरुवारी कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर शुक्रवारी अहमदनगर आणि पुणे येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल.