महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी घेतली खासदार शरद पवार यांची भेट !
तरूणांशी तब्बल अडीच तास चर्चा करून साधला मनमोकळेपणाने संवाद
दोंडाईचा (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या राजकारणात बापमाणूस म्हणावे असे सध्या एकमेव व्यक्तिमत्व आहे,ते म्हणजे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार अशा माणसाशी नुसते बोलायला मिळणे म्हणजे अहोभाग्य! अशा माणसाने आपला थोडा थोडका नाही, तर तब्बल अडीच तास वेळ आमच्या युवक काँग्रेसच्या नवनियुक्त टीमला दिल्याची माहिती राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल माणीक यांनी जनमतशी बोलताना दिली.
काल देशाच्या राजधानीत युवक काँग्रेसच्या शिलेदारांनी महाराष्ट्राच्या या सह्याद्रीची अर्थातच आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. ते स्वतः काँग्रेस पक्षाचे नेते नसतानाही युवक काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांसाठी त्यांनी वेळ दिला व सर्वांसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्यासोबत चर्चा करायला मिळणं म्हणजे वैचारिक मेजवानीच! ती संधी आमच्या हया नवीन शिलेदारांना मिळाली. पवार साहेब स्वतः देखील एकेकाळी युवक काँग्रेसमध्ये होते. त्या काळातील अनेक अनुभव व प्रसंगांना त्यांनी यावेळी उजाळा दिला. त्यांना राजकीय, सामाजिक विषयांबद्दल सखोल मार्गदर्शन केले. त्यातून नक्कीच आमच्या या नवीन टीमला एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळाली आहे.
या सर्वांमध्ये माझ्यासाठी विशेष सुखद अशीही एक गोष्ट घडली. पवार साहेबांनी अचानक माझा उल्लेख केला आणि स्व. राजीवभाऊ सातव यांच्याप्रमाणेच सत्यजीत संघटनेत मोठे काम करत असल्याचे उद्गार त्यांनी काढले! त्यांच्या नजरेत भरेल असं काम मला युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून करता आलं, याचं समाधान आहे.
पवार साहेब ज्या पद्धतीने नव्या पिढीला प्रेरीत करतात, ती बाब नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. आमच्या अनेक युवा मित्रांनी मला केलेल्या फोननंतर जाणवले की, युवक काँग्रेसच्या या नव्या टीमला या भेटीतून अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. नेहरू-गांधी यांचा विचार आणि काँग्रेस या देशातून कधीच संपू शकत नाही. तुम्ही सर्व युवकांनी आता काँग्रेसची धुरा हाती घ्या आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागा, असा संदेश देत त्यांनी या युवकांचा आत्मविश्वास वृद्धिंगत केला. ही खरोखर वाखाणण्याजोगी गोष्ट असल्याचे मत राज्य युवक काँग्रेसचे सरचिटणीस राहुल माणीक यांनी शेवटी व्यक्त केले.