थंड पाण्याच्या नावाखाली नागरीकांची लूट ; आरओ प्लांटकडून धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्हाभरात अशुद्ध पाण्याचा गोरख धंदा
धुळे : आरओ प्लांट व शुद्ध पाण्याच्या नावाखाली जिल्हाभरात अशुद्ध पाण्याचा गोरख धंदा जोरात सुरू आहे. अनेक पाणी शुद्धीकरण प्रकल्पांना अन्न व प्रशासन विभागाची मान्यता नाही. तर अनेक प्रकल्पात नियमानुसार आवश्यक असलेले फार्मसिस्ट, मायक्रोबायोलॉजिकल प्रयोगशाळाच अस्तित्वात नाहीत. या अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तसेच पाणीटंचाईमुळे व पाण्याची पातळीही खालावल्याने अशुद्ध पाणी मोठया प्रमाणात येते. त्यामुळे जिल्हाभरात व्यवसायिकांसह घरोघरी आरओ पाण्याचे जार विक्री करणार्यांकडून पाणी मागविले जात आहे. यासाठी पाणी विक्रीच्या व्यवसायात जिल्हाभरात शेकडो उद्योजक कार्यरत आहेत. यापैकी अनेक उद्योजकांकडे परवानाच नाही. पाणी प्रकल्प सुरू करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र मोठ्या प्रमाणात विनापरावाना हा उद्योग सुरू आहे. या सर्व गोरखधंद्याबाबत अन्न व प्रशासन विभागाचे अधिकारी मात्र अनिभिज्ञ असल्याचे निदर्शनास येत आहे. तर उद्योजक व या विभागाच्या अधिकान्यांमध्ये अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे हा उद्योग बिनभोबाटपणे सुरू आहे. विशेष म्हणजे पाण्याची शुद्धता तपासण्याची यंत्रणाच कुठल्याही प्रकल्पात नाही. या उद्योजकांनी अक्षरशः शासनासह नागरिकांची दिशाभूल करून शुद्धतेच्या नावाखाली अशुद्ध पाणी पुरवठा करून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा उद्योग सुरू केला आहे.
जिल्ह्यात पाण्याचे नैसर्गिक जलस्त्रोत वापरात नाही. परिणामी बोअरवेलद्वारे पाणी मिळवून त्यावर प्रक्रिया केली जाते. बोअरवेल मधील पाण्यातून क्षार, विषाणू, क्लोराईड व अन्य घातक द्रव्य काढणे आवश्यक आहे. त्यानंतरच हे पाणी पिण्यास योग्य होते. मात्र आवश्यक असलेली शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने थंड पाण्याच्या नावाखाली अशुद्ध पाणी विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. साधारणत: २० लिटरचे जार आज घरोघरी व प्रत्येक व्यावसायिकांकडे दिसत आहेत. यात अनेकांचे खिशे कापण्याचा प्रकार सुरू आहे. दिवसभरात जिल्हाभरात या व्यवसायाद्वारे लाखो लिटर पाण्याची विक्री केली जाते. परंतु पाणी शुद्ध कराण्याबाबत आवश्यक असलेली स्वच्छता, शास्त्रीय प्रक्रिया व पॅकिंग संदर्भातील निकषांची योग्य ती अंमलबजावणी केली जात नसल्याने केवळ थंड पाण्याच्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल करून त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा धंदा सुरू आहे. जिल्हाभरातील पाणी उद्योगाची व उद्योजकांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरीकांमध्ये जोर धरत आहे.
पाणी शुद्धतेसाठी विविध चाचण्यांचा अभाव
नियमानुसार पाण्याच्या शुद्धतेसाठी १४ शास्त्रीय प्रक्रिया व पाणी पिणे योग्य होण्यासाठी किमान ३२ प्रकाराच्या चाचण्या कराव्या लागतात. यासाठी एफडीए (फुड ऍण्ड ड्रग्स विभाग) ने मान्यता दिलेले यांत्रिक उपक्रम व औषधी वापरणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी डिसल नसीजन, डाळनेस, पीएच, ओडर, कलर, जिवाणूंची स्थिती, जडपणा व पाण्यातील टीडीएस कमी करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पात प्रयोगशाळा असणे बंधनकारक आहे. येथे एक निष्णात मायक्रोविलॉजीस्ट व फार्मसिस्ट असणे आवश्यक आहे. परिणामी येथे निर्माण करण्यात आलेले पाणी पिण्यास योग्य की अयोग्य असा गहन प्रश्न निर्माण झाला आहे.