एनएचएम अंतर्गत तालुकास्तरीय मेडिकल कॅम्पचे आयोजन ; केंद्राकडून मिळाला एक कोटीचा निधी : खा. इम्तियाज जलील
तज्ञ डॉक्टर, मोफत औषधी व रक्त चाचण्या ; रुग्णांनी लाभ घ्यावा
औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) योजने अंतर्गत ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची तज्ञ डॉक्टर मार्फत आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार, रक्त चाचण्या आणि विविध आरोग्य संबंधी योजनांचा लाभ देण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तालुकास्तरीय आरोग्य मेळावे (मेडिकल कॅम्पचे) आयोजन करण्यासाठी केंद्र शासनाने एक कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी दिली.
या महिन्यात होणारे आरोग्य मेळावे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागांतर्गत उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली होणार असून, आरोग्य मेळावे प्रभावीपणे व यशस्वी तसेच समन्वयाने होणेकरिता जिल्हाधिकारी नियोजन करणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मेळावे यशस्वी करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा यासाठी संबंधित तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित करण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यानी म्हटले आहे.
आरोग्य मेळाव्यात ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार, विविध सोयी सुविधा, संसर्गजन्य व असंसर्गजण्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लोकामध्ये जागरूकता निर्माण व्हावी, आरोग्य शिक्षणाचे महत्व आणि आरोग्य संबंधी योजनांचा व्यापक स्वरूपात लाभ मिळावा यासाठी जिल्ह्यातील इतर शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, नागरी संस्था आणि कॉर्पोरेट देणगीदार यांचा सुध्दा सहभाग केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे घेण्यात येणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यानी म्हटले आहे.
प्रत्येक तालुक्यात आरोग्य मेळावे तालुका मुख्यालय, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित होणार आहे. भिषक, शल्य चिकित्सक, बालरोग तज्ञ, कान, नाक व घसा तज्ञ, प्रसूती व स्त्री रोग तज्ञ, दंत चिकित्सक व बधिकरन तज्ञ येणाऱ्या रुग्णाची आरोग्य तपासणी करून त्यांना विविध औषधोपचार मोफत देणार आहे. तसेच गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करून शस्त्र क्रियेसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी दिली आहे.
याव्यतिरिक्त आरोग्य मेळाव्यात विविध आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमाबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल उदा. आयुष्यमान भारत हेल्थ अँड वेलनेस सेंटर्स व PM-JAY योजना, उपस्थितांसाठी ABDM अंतर्गत युनिक हेल्थ आयडी कार्ड तयार करण्याची सुविधा असणार, पात्र नागरिकांसाठी AB-PM-JAY अंतर्गत आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी मदत केली जाईल, विविध आजार प्रतिबंधासाठी जागरूकता व आरोग्य शिक्षण करिता मार्गदर्शन केले जाईल तसेच आरोग्य संबंधी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यानी दिली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या महिन्यात त्यांच्या त्यांच्या तालुक्यात आयोजित होणाऱ्या आरोग्य मेळाव्यात भेट देवून आरोग्य तपासणी, मोफत औषधी व विविध योजनांचा लाभ घेण्याचे आव्हान खासदार इम्तियाज जलील यानी केले आहे.