अनिल परब यांनी किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखावा : गोपीचंद पडळकर
पुणे (वृत्तसंस्था) भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. तसंच महसुलात घट झाल्यानेच शरद पवार चर्चा करण्यास भाग पडले असा दावा केला. गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असं म्हटलंय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल, याची आठवण देखील पडळकर यांनी करुन दिलीय. माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.
गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं लढा दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असल्याचं म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.



