नंदुरबार आगारात इंधन बचत अभियानास प्रारंभ
नंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातर्फे दिनांक 11 ते 30 एप्रिल दरम्यान इंधन बचत पंधरवाडा अभियानास प्रारंभ झाला. नंदुरबार आगाराच्या कार्यशाळेत दिनांक 11 एप्रिल रोजी इंधन बचत अभियानाचा शुभारंभ झाला. सहाय्यक वाहतूक मोटार निरीक्षक निलेश पाटील यांच्या हस्ते क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना निलेश पाटील म्हणाले की, एसटी बसचालकाने आपले वेग नियंत्रित ठेवल्यास आणि बिघाडापूर्वीची देखभाल काळजी घेतल्यास इंधनाची बचत होईल. आपल्या शरीरा प्रमाणेच एसटीची काळजी घेऊन चालकासह इतर कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे असे आवाहन पाटील यांनी केले. याप्रसंगी आगारप्रमुख मनोज पवार यांनी सांगितले की, मानवाचे नाक बिघडले तर श्वास घेणे शक्य होत नाही. त्याच प्रमाणे एसटीचे इंजिन आणि एअर फिल्टरची काळजी घेण्याचे काम चालकाचे आहे. शासनाकडून मिळणारी सवलत बंद झाल्याने जादा दराने इंधन खरेदी करावे लागत आहे. असेहि मनोज पवार यांनी सांगितले. या कार्यक्रमास सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक योगेश शिवदे, वाहतूक निरीक्षक रमेश वळवी, दिलीप वळवी, राजेंद्र पाटीलसह कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.जी. वळवी यांनी केले.