शिंदखेडा पंचायत समिती समोर खानदेश वारकरी मंडळातर्फे भजने गात धरणे आंदोलन
शिंदखेडा (यादवराव सावंत) पुंडलिका धवरदे हरी विठ्ठल….. अशा घोषणा देत ..टाळ-मृदंगाच्या तालावर भजने म्हणत खानदेश शाहीर कलावंत वारकरी मंडळातर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी आज येथील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. एरवी विविध मंदिरात गायिल्या जाणार्या भजनांचा पंचायत समितीच्या आवारातूनच आवाज येत असल्याने, येथून जाणार्या येणार्या नागरिकांसह कॉलनी परिसरातील नागरिकही अवाक झाले होते.
आज सकाळी अकरा पासूनच वरूळ रोडलगत पंचायत समितीच्या कार्यालयासमोर भव्य मंडप टाकून वारकरी मंडळातर्फे हे आंदोलन सुरू करण्यात आले. या आंदोलनात शिंदखेडा तालुक्यातील केवळ वारकरीच नाही तर शाहीर कलावंत, साहित्यिक, कवी, लेखक, तमाशा कलावंत, एकतारी लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, आराधी, टिंगरेवाला यासह स्थानिक सांस्कृतीक कलाक्षेत्रातील शेकडो कलावंत सहभागी झाले होते. यात महिलांची ही मोठी संख्या होती.
गेल्या तीन वर्षापासून शासनाकडे कलावंतांच्या मागण्यांची निवेदने दिली आहेत. त्याचा पाठपुरावा केला जात आहे. मात्र शासन स्तरावर याबाबत कोणतीही दखल घेतली गेली नाही. याबाबत चौकशी करायला गेले असता संबंधित अधिकारी आणि कर्मचारी वृद्ध कलावंतांना अरेरावीची उत्तरे देतात, त्यांचा अपमान करतात कोणतेही सहकार्य करत नाही. समाधान कारक उत्तरे देत नाही. असा यावेळी आरोप करण्यात आला. शासनाने आमच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून मागण्या मान्य कराव्या आणि कलावंतांना न्याय द्यावा अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या कलावंतांनी केली आहे. त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शिंदखेडा यांच्याकडे देण्यात आलेले आहेत.
आंदोलनात प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप, जिल्हाध्यक्ष खेमराज पवार, तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र पवार, सचिव सरलाबाई माळी, रत्नाबाई माळी, मंगलाबाई माळी, प्रकाश पाटील, मनोहर पवार, भालेराव पवार, दिगंबर वाघ, संजय मोरे, चतुर पाटील, विश्वास माळी, नरेंद्र गिरासे, योगेश बागुल, दिलीप पाटील, मोतीलाल पवार, दगडू पाटील ,मधुकर सोनवणे, शांतीलाल पाटील ,बटू पाटील, हिरालाल माळी ,लुका मराठे, अतुल पाटील, सावकार अहिरे, सुशील मिस्त्री, विशाल गिरासे, संदीप जोशी, सुदाम मिस्तरी, ईश्वर सिंग गिरासे, महारू माळी, नागराज पाटील, जयसिंग गिरासे, शिवदास माळी, पांडुरंग वाघ, हिम्मत पवार आदी उपस्थित होते.
मागण्या या प्रकारच्या
* प्रत्येक गावाच्या भजनी मंडळास भजनी साहित्य मिळावे
* जनजागृतीच्या लोक कल्याणकारी कार्यक्रमात सहभागी करून दहा हजार रुपये मानधना वर्षातून दोन वेळेला मिळावे
* वृद्ध कलावंतांना मानधन देण्यासाठी मानधन निवड समिती गठित करावी
* वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करून दरमहा पाच हजार रुपये मानधन मिळावे
* आजारी वृद्ध कलावंतांना मोफत वैद्यकीय सेवा मिळावी
* एसटी आणि रेल्वे प्रवासात कलावंतांना 75 टक्के सूट मिळावी.
आमच्या फार काही मोठ्या मागण्या नाही. आम्ही शासनाच्या विरोधात घोषणा देत नाही. मात्र आमच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घ्यावे, शासनाला जाग आणावी यासाठी शांततेच्या मार्गाने हे धरणे आंदोलन आम्ही करीत आहोत, असं प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप म्हणाले.