सोयगाव येथील शेतकऱ्यांचा उपोषणास बसण्याचा इशारा
सोयगाव (जि.औरंगाबाद) : विवेक महाजन, तालुका विशेष प्रतिनिधी
सोयगांव : शेतात सीताफळ, मोसंबी अशा फळबागा असतांना व त्याची नोंद सातबाऱ्यावर असून देखील अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची मदत ही जिरायत पिकांची मिळाल्यामुळे बागायती मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी तहसीलदार रमेश जसवंत यांची भेट घेऊन बागायती मदत दया अन्यथा उपोषणास बसण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.
सोयगांव, आमखेडा, गलवाडा, सोनसवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणात सीताफळ बागा आहेत. तर काही मोसंबीच्या बागा देखील आहे. यंदा अनेकवेळा झालेल्या अतिवृष्टीत या फळबागांचे अतोनात नुकसान झाले. त्यावेळी शेतकऱ्यांनी नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी तलाठी, कृषी अधिकारी व ग्रामसेवक यांना अनेकवेळा केली. काही शेतकऱ्यांनी तर लेखी मागणी केली त्यावेळी तुमच्या सातबाऱ्यावर फळपिकांची नोंद आहे त्यामुळे तुम्हाला बागायती मदत मिळेल असे सांगण्यात आले. परंतु आता मात्र शेतकऱ्यांना बागायती मदत न मिळता जिरायती पिकांची मदत मिळाली. तालुक्यातील काही गावात शेतकऱ्यांना बागायती मदत मिळाली सोयगांवचे शेतकरी मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे वंचित राहिले त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज तहसीलदार रमेश जसवंत यांची भेट घेतली व बागायती मदत मिळावी अशी मागणी करत न मिळाल्यास दि २३ नोव्हेंबर पासून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय ढगे, अशोक रोकडे,अमोल चौधरी, राजू दुतोंडे,अरुण सोहनी,डॉ ज्ञानेंद्र पायघन, चंद्रास रोकडे,सुनील रोकडे,बबलू सोहनी,भगवान मानकर, अंबादास ढगे, धनराज आस्वार, राजू रोकडे,कांताबाई बाबुराव सोनवणे,गयाबाई रोकडे, भिकन रोकडे, श्रीराम सोहनी, गणेश आगे, सुभाष काळे, हर्षल मानकर, सुनील काळे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते.