तर देशात २०५० नंतर कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही ; गौतम अदानी यांचा अर्थव्यवस्थेबाबत अंदाज
मुंबई : उद्योगपती गौतम अदानी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत एक अंदाज व्यक्त केला आहे. देशानं २०५० पर्यंत ३० ट्रिलियन डॉलर्सचं लक्ष्य गाठलं तर या देशात कुणीही उपाशी पोटी झोपणार नाही, असं उद्योगपती गौतम अदानी यांनी सांगितलं आहे. त्यांनी इकोनॉमिक कॉन्क्लेव्हमध्ये हे वक्तव्य केलं.
“आपण २०५० पासून सुमारे १० हजार दिवस दूर आहोत. या काळात आपण आपल्या अर्थव्यवस्थेत २५ ट्रिलियन डॉलर्सची भर घालू असे मला वाटते. याचा अर्थ जीडीपीमध्ये दररोज २.५ अब्ज डॉलर्सची भर पडेल. या काळात आपण सर्व प्रकारची गरिबी दूर करू.” असं गौतम अदानी यांनी सांगितलं. २०२१ मध्ये अदानी समूहाच्या अध्यक्षांची संपत्ती इलॉन मस्क आणि जेफ बेझोस या जगातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्तींपेक्षा वेगाने वाढली. मस्क आणि बेझोस यांच्या एकूण मालमत्तेत ८१ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे तर एकट्या अदानींची संपत्ती ४९ अब्ज डॉलर्सने वाढली आहे.
अदानीच्या म्हणण्यानुसार, जर सर्व काही अंदाजानुसार घडले, तर या १० हजार दिवसांत शेअर बाजाराचे भांडवल ४० ट्रिलियन डॉलर्स होईल. याचा अर्थ शेअर बाजाराचे भांडवलीकरण या काळात दररोज ४ अब्ज डॉलर्सने वाढेल. यामुळे १४० कोटी लोकांचे जीवनमान सुधारणे हे अल्पावधीत मॅरेथॉनसारखे वाटेल पण दीर्घकाळासाठी योग्य ठरेल.
दुसरीकडे, २०११ ते २०१९ दरम्यान भारतातील गरिबीच्या दरात मोठी घट झाल्याचे जागतिक बँकेने सांगितलं आहे. नवीन अहवालानुसार, या कालावधीत भारतातील गरिबी दर १२.३ टक्क्यांनी कमी झाला आहे. शहरांपेक्षा ग्रामीण भागात गरिबी अधिक कमी झाली आहे. ग्रामीण गरिबीचा दर २०११ मध्ये २६.३ टक्के होता, जो २०१९ मध्ये ११.६ टक्क्यांवर आला. शहरी गरिबी दर १४.२ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांवर आला आहे.