दोंडाईच्या जन सहयोग प्रतिष्ठानतर्फे मोफत वक्तृत्व कार्यशाळाचे आयोजन
दोंडाईचा (प्रतिनिधी) सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्यरत असलेल्या जन सहयोग प्रतिष्ठानतर्फे दि. १२ डिसेंबर २०२१ रविवार रोजी दोंडाईचा येथील शाम कृपा भवन, पी.बी. बागल महाविद्यालय जवळ, स्वामी नारायण मंदिर समोर विनामूल्य वक्तृत्वाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यशाळा सकाळी १० ते १२ आणि दुपारी ४ ते ६ अशा दोन सत्रात होणार असून कार्यशाळेत भाषण कलेचे महत्व, भाषण कलेतून करीयर करायच्या संधी, भाषण कसे करावे, भाषणाची भीती – अडथळे कसे दूर करावेत, भाषणात काय करावे, काय करू नये, सभाधिटपणा, देहबोली, आवाजाचा चढ उतार, आवाजाची गती, प्रभावी शब्द फेक, भाषणात टाळ्या मिळवण्याचे तंत्र, भाषणाचे प्रकार यासह विविध मुद्यांवर पत्रकार व प्रेरणादायी वक्ते राजेश ईशी मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच विविध विषयाचे ज्ञान, माहिती, अभ्यास, अनुभव असताना देखील केवळ वक्तृत्व, सादरीकरण व संवाद कला नसल्यामुळे आपला प्रभाव पडत नाही व स्पर्धेच्या युगात मागे पडतो, असा सार्वत्रिक अनुभव आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, व्यापार, विक्री तसेच स्पर्धात्मक परीक्षेत होणारी मुलाखत असो या सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी वक्तृत्व व संवाद कला म्हणजे यशाचा पासवर्ड ठरला आहे.
दैनंदिन जीवनात सर्वच क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या विनामूल्य होणाऱ्या कार्यशाळेत विद्यार्थी वर्गासह पालक, राजकीय सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, व्यवसायिक, व्यापार तसेच विमा विक्री क्षेत्रातील व्यक्ती, गृहिणी तसेच भाषण कला शिकू इच्छिणाऱ्यांनी हया कार्यशाळेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. डॉ. धैर्यशील देवरे, डॉ.राजेंद्र पाटील, सुहास साठे, संजय नगराळे, प्रवीण गिरासे, चंद्रकांत बैसाने, पत्रकार जे.पी.गिरासे, साहित्यिक लतिका चौधरी आदींनी केले आहे.