काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमकं करा..मग आधीपासून ; अजित पवारांचा राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये एका जाहीर सभेत बोलताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमकं करा.. मग इतक्या आधीपासून तुम्ही काय केलं? तेव्हा कळलं नाही का? आज राज्य कोरोनाच्या संकटानंतर रुळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय”, असं अजित पवार म्हणाले.
मशिदींवरील भोंग्यांवरून अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “सध्याचं राज्यातलं वातावरण गढूळ करण्याचं काम सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वर्षानुवर्ष आपण गुण्या गोविंदाने नांदतोय. रामनवमी, हनुमान जयंती, आंबेडकर जयंती, रमजान, गुढीपाडवा असे सगळे सण एकमेकांना शुभेच्छा देऊन आपण साजरे करतोय. पण काय कारण आहे हो? भोंगे बंद करा, अमकं करा.. मग इतक्या आधीपासून तुम्ही काय केलं? तेव्हा कळलं नाही का? आज राज्य कोरोनाच्या संकटानंतर रुळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करतोय”, असं अजित पवार म्हणाले.
दोन दिवसांपूर्वीच अजित पवारांनी राज ठाकरेंच्या विधानाचा अशाच प्रकारे शिर्डीत बोलताना समाचार घेतला होता. “अरे भाषण करणं सोपं आहे रे बाबा. पण आता त्यांच्याच पक्षाचे नगरसेवक आम्हाला निवडून यायचं आहे आणि हे काय सांगताय सांगू लागले आहेत. कोणाला तरी बरं वाटण्यासाठी, निवडणुकीवर डोळा ठेवून अशा प्रकारची भाषणं, वक्तव्यं करायची हे आपल्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परडवणारं नाही,” असं ते म्हणाले होते. “काही लोक समाजात संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करतात. कित्येत वर्ष लोक गुण्यागोविंदाने वर्षानुवर्षे एकमेकांना साथ देत आहेत, जातीय सलोखा ठेवला आहे, जातींमध्ये, धर्मात तेढ निर्माण होऊ देत नाही. पण काही पक्षाचे नेते इथं असं करा, इथं हा भोंगा लावा, तिथं हा भोंगा लावा सांगत आहेत”, असं देखील अजित पवारांनी नमूद केलं होतं.