कोरड्या राजकारणात मला रस नाही, दोन चार महिन्यात नव्या रुपात येतो : तानाजी सावंत
पंढरपूर (प्रतिनिधी) शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा सूचक विधान करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. (Shivsena)पक्षावर नाराज असलेल्या आणि भाजपशी जवळीक साधून दबाव तंत्राचा वापर करणारे तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी आज `येत्या दोन-चार महिन्यात दिवस बदलतील, मी नव्या रुपात तुमच्या समोर येणार आहे. (Maharashtra) मग माझ्याकडे काय मागायचे ते मागा`, असे आवाहन उपस्थितांना केले. कोरड्या राजकारणात आपल्याला रस नाही, असेही ते म्हणाले.
त्यामुळे आता त्यांचे नवे रुप नेमके काय असणार आहे, याची उत्सूकता त्यांच्या समर्थकांना लागून राहिली आहे. गेल्या युतीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले शिवसेनेतील वजनदार नेते म्हणून तानाजी सावंत ओळखले जातात. पण राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सावंत झाकोळले गेले.
गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा मंत्रीपदाची संधी मिळेल, अशी त्यांना आशा होती, पण ती पक्षाच्या सरकारमध्ये वाट्याला येणाऱ्या मर्यादित मंत्रीपदावर कुणाची वर्णी लावावी असा प्रश्न पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर होता. यात सावंत यांचे नाव मागे पडले आणि दोन वर्षानंतर देखील त्यांच्या नावाचा विचार झालेला नाही. त्यामुळे सावंत नाराज असून ते भाजपमध्ये जाणार अशा चर्चांना जिल्ह्यात व राज्यात उधाण आले आहे.
भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी तुळजापुरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासमेवत घेतलेल्या भेटीकडे त्याच दृष्टीने पाहिले जात आहे. त्यातच पंढरपुरात एका कार्यक्रमात सावंत यांनी पुन्हा एकदा सूचक विधान करत पक्षाला इशाराच दिल्याचे दिसते. राज्यात सत्ता बदलाची चर्चा भाजप नेते करत असतानाच आता सत्ताधारी शिवसेनेच्या एका मंत्र्यानेच येत्या तीन चार महिन्यात राज्यातील सत्तेचे दिवस बदलतील.
पुन्हा वेगळ्या रुपात तुमच्या समोर येणार आहे, काही मागायचं ते मागा, असे सांगत सत्ता बदलाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आमदारांमध्ये असलेली खदखद पुन्हा एकदा या निमित्ताने समोर आली आहे. भूम- परांड्याचे शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले आहे. या संदर्भातील त्यांचा एक व्हीडीओ सोशल मिडीयात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
शिवसेनेचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील छुपा राजकीय संघर्ष नुकताच समोर आला आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांचा हा व्हीडीओ समोर आल्याने शिवसेना आमदारातील नाराजी व खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. शिवसेना आमदारांची कामे होत नसल्यानेही काही शिवेसना आमदारांमध्ये झुपी नाराजी आहे. त्यातूनच आमदार तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केले असावे असा अदांज व्यक्त केला जात आहे.