मोठ्या घातापाताचा कट उधळला, ४ दहशतवाद्यांना अटक ; महाराष्ट्र कनेक्शन ही आले समोर
हरियाणा : हरियाणातील कर्नालमध्ये पोलिसांनी चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये गोळ्या आणि गनपावडर कंटेनरचा समावेश आहे.
चौघांना गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास बस्तारा टोल प्लाझाजवळून अटक करण्यात आली. सर्वजण मोठ्या एसयूव्हीमधून जात होते. हे सर्वजण पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. आयबीच्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे चौघेही पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) शी संबंधित आहेत. त्यांना पकडण्यासाठी गुप्तचर विभाग, पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. रोबोटच्या मदतीने संशयितांच्या कारची तपासणी करण्यात आली. त्यात आणखी स्फोटके असण्याची शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचे वय सुमारे २० ते २५ वर्षे आहे. हे शस्त्र सांगितलेल्या ठिकाणी सोडून येण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. हे लोक पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते, २अशीही माहिती समोर आली आहे.
कर्नालचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित सध्या महाराष्ट्रातील नांदेड येथे जात होते. पाकिस्तानमध्ये राहणारा दहशतवादी हरजिंदर सिंगने या दहशतवाद्यांना हे कंटेनर आणि इतर वस्तू तेलंगणातील आदिलाबाद जिल्ह्यातील एका ठिकाणी पोहोचवण्याची सूचना केली होती. त्यांनी यापूर्वीही दोन ठिकाणी आयईडीचा पुरवठा केला आहे. या दहशतवाद्यांच्या फोनमध्येही हे लोकेशन सापडले आहे. या दहशतवाद्यांमध्ये गुरप्रीत हा मुख्य असल्याचं समजतं, ज्याच्याशी पाकिस्तानातील दहशतवादी हरजिंदर सिंग याचा सतत संपर्क असायचा.
खलिस्तानी दहशतवादी रिंडा याने ही शस्त्रे पाकिस्तानातून फिरोजपूरला ड्रोनद्वारे पाठवली होती. पकडलेल्या दहशतावाद्यांमध्ये तीन फिरोजपूरचे तर एक लुधियाना येथील रहिवासी आहे. आरोपीचे म्हणणे आहे की, तो तुरुंगात आणखी एका दहशतवाद्याला भेटला होता. सध्या त्यांच्याजवळून एक देशी बनावटीचे पिस्तूल, ३१ जिवंत काडतूस आणि ३ लोखंडी पेट्या सापडल्या आहेत. यामध्ये प्रत्येक पेटीचे वजन सुमारे अडीच किलो आहे.