इस्रोची शुक्रावरील मोहिमेसाठी तयारी सुरू
नवी दिल्ली : चंद्र आणि मंगळाच्या कक्षेत यान पाठवण्याचा अनुभव असलेल्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) आता शुक्राच्या कक्षेत यान पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. ‘शुक्रयान’ असे संभाव्य नामकरण असलेली ही मोहीम पुढील अडीच वर्षांत, म्हणजे डिसेंबर २०२४मध्ये प्रक्षेपित करण्याचा ‘इस्रो’चा प्रयत्न आहे.
शुक्र मोहिमेवर विचार झालेला आहे, तिचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे व तिच्यासाठी निधी मिळणे निश्चित झाले आहे, असे ‘शुक्र विज्ञानावरील’ एक दिवसाच्या बैठकीला संबोधित करताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले. या मोहिमेच्या प्रभावी फलितावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी शास्त्रज्ञांना केले.

‘शुक्र मोहिमेची आखणी करणे व ती प्रत्यक्षात आणणे यांची क्षमता भारताकडे असल्यामुळे, अतिशय कमी वेळेत ही मोहीम पूर्ण करणे भारताला शक्य आहे’, असे सोमनाथ त्यांच्या उद्घाटनाच्या भाषणात म्हणाले. ही मोहीम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करणे आणि त्यानंतरच्या वर्षांत अंतराळ यान शुक्राच्या कक्षेत फिरत ठेवणे असे लक्ष्य ठेवण्याचा इस्रोने विचार केला आहे. या वर्षांत पृथ्वी व शुक्र यांची स्थिती अशी राहणार आहे, की प्रणोदकाचा (प्रॉपेलंट) कमीत कमी वापर करून यान शुक्राच्या कक्षेत ठेवणे शक्य होणार आहे.




