मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी भारतीय खासगी आरोग्य कंपनीच RT-PCR किट, इतक्या वेळात मिळणार रिपोर्ट
नवी दिल्ली : एका भारतीय खासगी आरोग्य कंपनीने मंकीपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी रियल-टाइम RT-PCR किट तयार केली आहे. या किटचा वापर करून रुग्णाला ऑर्थोपॉक्स विषाणू म्हणजेच मंकीपॉक्सची लक्षणे आहेत की नाही हे कळेल.
‘ट्रिविट्रॉन हेल्थकेअर’ने शुक्रवारी मंकीपॉक्स विषाणूचा शोध घेण्यासाठी RT-PCR किट विकसित करण्याची घोषणा केली. याबाबद ट्रिविट्रॉन हेल्थकेअरने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या संशोधन आणि विकास पथकाने मंकीपॉक्स विषाणू शोधण्यासाठी आरटी-पीसीआर आधारित किट विकसित केली आहे. ट्रिविट्रॉनचे मंकीपॉक्स रिअल-टाइम पीसीआर किट हे ४ रंगी फ्लूरोसेन्स आधारित किट आहे. ही किट एकाच ट्यूबमध्ये चेचक आणि मंकीपॉक्समध्ये फरक करू शकते. याचा अहवाल मिळण्यास एक तास लागणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
अशा प्रकारे मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग होतो
मंकीपॉक्स विषाणू संक्रमित प्राण्याच्या चाव्याव्दारे किंवा त्याचे रक्त, शरीरातील द्रव किंवा फर यांना स्पर्श करून संक्रमित होऊ शकतो. हे उंदीर, ससे यांसारख्या प्राण्यांच्या चाव्याव्दारे पसरते असे मानले जाते. हा विषाणू माणसांमध्ये खूप वेगाने पसरतो. तुम्ही संक्रमित व्यक्तीचे कपडे वापरल्यास तुम्हाला मंकीपॉक्स होऊ शकतो. हा विषाणू शिंक आणि खोकल्यामुळे देखील पसरू शकतो.
मंकीपॉक्सची लक्षणे काय आहेत?
मंकीपॉक्सची लागण झाल्यापासून पाच दिवसांत ताप, तीव्र डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायू दुखणे आणि थकवा यासारखी लक्षणे दिसून येतात.
मंकीपॉक्स सुरुवातीला चिकनपॉक्स, गोवर किंवा चेचक यांसारखा दिसतो.
ताप आल्यानंतर एक ते तीन दिवसांनी त्याचा परिणाम त्वचेवर दिसू लागतो.
शरीरावर पिंपल्स दिसतात.
हात, पाय, तळवे, पायाचे तळवे आणि चेहऱ्यावर लहान मुरुम दिसण्यास सुरुवात होते.
हे मुख्यतः चेहरा आणि हाताचे तळवे आणि पायांच्या तळवे यांना प्रभावित करते.