सिल्लोड येथे उभारणार महाराणा प्रताप यांचा पुतळा : राज्यमंत्री अब्दुल सत्तार
सिल्लोड : सिल्लोड शहरात येत्या वर्षभरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणार असल्याची ग्वाही महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. येणाऱ्या महाराणा प्रताप जयंतीच्या दिवशी या पुतळताचे अनावरण करून महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करू असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
भोकरदन जि. जालना येथे सिल्लोड, भोकरदन व जाफराबाद महाराणा प्रताप जन्मोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने क्रांतिसूर्य महाराणा प्रताप जयंती साजरी करण्यात आली. जयंती निमित्त प्रसिद्ध व्याख्याते सचिन देवरे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार व समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोमवार (दि.9) रोजी भोकरदन जि.जालना येथील बाजार समितीच्या प्रांगणात हा सोहळा संपन्न झाला. या सोहळयाप्रसंगी मार्गदर्शन करीत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार बोलत होते.
यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पा. दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, हवामान तज्ञ पंजाबराव डक, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख , शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव, औरंगाबाद जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पाटील गाडे सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतीश ताठे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, विजय नाना परिहार, भगवानजी डोभाळ, मोहनशेठ हिवरकर, महादू डोभाळ, हुकुमसेट चंडुल, सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी विजयसिंह पवार, गटविकास अधिकारी उदय लसिंग राजपूत, रघुवीरसिंग चंदेल, डॉ.राजपूत, शेख नजीर , रामेश्वर भुते यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी रणजीत डेडवाल, विशाल महाले ,राजू खंडाळकर, भगवानसिंग बैनाडे, विनोद खंडाळकर, डॉ. विकास गोठवाल, मानसिंग राजपूत यांच्यासह सिल्लोड, भोकरदन, जाफराबाद येथील सकल राजपूत समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पुढे बोलत असतांना राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, राजपूत समाजाला जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाने काही नियम शिथिल केले. समाजाला आता सहज जातीचे प्रमाणपत्र मिळत असल्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. यावेळी आयोजकांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार व्यक्त करीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना क्रांतिसूर्य महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.



