बोगस बियाणे विक्रीवर कृषी विभागाची करडी नजर
मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्र याठिकाणाहून येणारे बोगस बियाणे लक्ष घालण्याची मागणी
दोंडाईचा : बोगस बियाणे विक्रिला आळा घालण्यासाठी धुळे जिल्ह्यात पाच भरारी पथक गठित करण्यात आली आहेत. सदर पथक बोगस बियाणे विक्री करडी नजर ठेवून आहेत. खरीप हंगाम जवळ येत असून येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना बी बीयाणे, खते व इतर कृषी निविष्ठा वेळेत उपलब्ध व्हावीत म्हणून कृषी विभागाने नियोजन केले आहे . त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा स्तरावर १ तर तालुका स्तरावर प्रत्येकी १ प्रमाणे 4 अशी एकूण 5 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे.
जिल्हा स्तरावर कृषि विकास अधिकारी हे भरारी पथकाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून पथकात कृषी विकास अधिकारी, मोहिम अधिकारी , निरीक्षक वजनमापे हे सदस्य तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा गुणवत्ता अधिकारी नियंत्रण निरीक्षकाचा समावेश या पथकात असणार आहे . तालुका स्तरावर तालुका कृषि अधिकारी हे पथक प्रमुख म्हणून काम पाहतील तर निरीक्षक वजनमापे , मंडळ कृषि अधिकारी, कृषी अधिकारी हे सदस्य असतील. बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी या पथकांची स्थापना करण्यात आली असून या पथकामार्फत कृषि सेवा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळणार आहे. तसेच अनाधिकृतरित्या व्रिकी होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीला प्रतिबंध बसणार आहे. शेतकऱ्यांनी अधिकृत बियाण्याची खरेदी बियाणे खरेदीची पावती, खरेदी केलेल्या बियाणे पाकिटाचे टॅग व लॉट क्रमांक पडताळून पाहावे. पेरणी झाल्यावर बियाणे पाकिट पीक निघेपर्यंत सांभाळून ठेवावे, शेतकऱ्यांनी अनधिकृत बियाण्याची खरेदी करु नये, कीटकनाशके, तण नाशकांची खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी. खत विक्री करणाऱ्या फ्लाय सेलर्सकडून खतांची खरेदी करु नये. जादा दराने कृषी निविष्ठाची विक्री करत असल्यास त्याबाबत जिल्हास्तरीय किंवा तालुका कृषी कार्यालयाकडे तक्रार करावी, असे आवाहनही कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे..
मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील देखील काही ठिकाणातून बोगस बियाणे शहरात दाखल होते. हे बियाणे कृषी केंद्र चालक घेऊ चोरी छुप्या पद्धतीने शेतकऱ्यांना विक्री करत असतात. यात खास करून शेतकऱ्यांना बियाणे खरेदीची बिल देत नसतात. मात्र बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होतो. आर्थिक अडचणींच्या सामोरे जावे लागते. शेतकरी कमी दरात मिळत असलेले बियाणे विकत घेतो व त्याचा भुर्दंड त्याला शेवटी सहन करावा लागतो मात्र संबंधित प्रशासनाने याकडे काटेकोरपणे लक्ष दिले तर सदर प्रकारावर नक्कीच आळा घालण्यात कृषी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना यश येणार आहे. मात्र काही ठिकाणी कृषी कर्मचाऱ्यांचे हप्ते बांधले असल्याकारणाने या ठिकाणी सर्रासपणे बोगस विक्री होत असल्याचे काही शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे