तरुणाने एका कापड दुकानदाराचे १ लाख १० हजार रुपयांचे सोने केले परत
सोयगाव (विवेक महाजन) तालुक्यातील बनोटी येथील २५ वर्षीय बेरोजगार तरुणाने महीना भराच्या शोधानंतर एकही रुपयाचा मोबदला न घेता इमानदारीने एका कापड दुकानदाराचे १ लाख १० हजार रुपये किमतीचे ब्रेसलेट परत केले आहे.
पिंपळगाव (हरेश्र्वर) जि. जळगाव येथील कापड दुकान मालक मिलींद दत्तात्रय देव हे एका महिन्यापूर्वी बनोटी येथे चारचाकी कार पहाण्यासाठी आले होते. गाडी बघुन झाल्यावर घरी परतल्यावर हातातील ब्रेसलेट कुठेतरी पडल्याचे समजल्यावर त्यांनी बनोटी तसेच ज्या मार्गाने ते आले तेथे तपास केला परंतु कोठेही शोध लागला नव्हता.
बनोटी येथील गरीब शेतकरी शालीक खैरनार यांचा मुलगा महेश खैरनार आणि पायगव्हाण दोघे शेतातून परतांना बनोटी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर अर्धवट उघडे पडलेले ब्रेसलेट महेश यास दिसले. त्याने उचलुन घरी वडीलांना दाखविल्यावर सोन्याचे असल्याचे समजल्यानंतर वडील शालीक खैरनार, महेश खैरनार मित्र पायगव्हाण यांनी तीन आठवडे सोने सापडले असल्याची चर्चा मित्रपरिवारात केली. त्यावर बनोटी येथील कापड दुकान मालक दिनेश चौधरी यांनी माझे सहकारी दुकानदारांचे ब्रेसलेट हरवल्याचे सांगितल्यावर ओळखीची पडताळणी करण्यात आली.
पिंपळगाव येथुन मिलींद यांनी बनोटी गाठून महेशच्या वडीलांना ब्रेसलेट खरेदीची पावती, पीनजी नंबरची ओळख दिल्यावर ब्रेसलेट सोपविण्यात आल्याने व्यापारी मिलींद यांनी पियुष यास भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी सरपंच मुरलीधर वेहळे, सरपंच सागर खैरनार, शालीक खैरनार, उमेश महालपुरे, संदिप सोनवणे, नाना सोनार, सचिन पाटील, विकास पवार, दादाराव पवार, प्रविण नाव्ही आदींसह ग्रामस्थांनी कौतुक करीत अभिनंदन केले.