पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात लष्कर दिवस उत्साहात संपन्न
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथे आज पंकज कला व विज्ञान महाविद्यालय चोपडा तसेच कै. अण्णासाहेब पितांबर शंकर वाडीले कला महाविद्यालय, थाळनेर संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग, आयोजित लष्कर दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. महादेव वाघमोडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. गिरीश गावित (कै. अण्णासाहेब पितांबर शंकर वाडीले कला महाविद्यालय थाळनेर ता. शिरपूर) हे होते. भारतीय लष्कर दिवस या विषयी माहिती देत असताना डॉ. गावित यांनी भारतीय लष्कराचे प्रथम प्रमुख फिड्ड मार्शल के. एम. करिआप्पा यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला. तसेच भारतीय लष्कराचे महत्त्व, त्याचे जगातील स्थान, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उज्वल यशाची परंपरा इत्यादी विषयांची माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयचे प्राचार्य डाॕ. महादेव वाघमोडे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना लष्करी सेवेत जाण्याचे आव्हान केले. तसेच भारतीय लष्करात झालेले विविध बदल या विषयी माहिती दिली. सदर ऑनलाईन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि प्रास्ताविक प्रा. दिपकराव देवरे यांनी केले तर आभार प्रा. संजय संतोष पाटील यांनी मानलेत. या कार्यक्रमासाठी दोन्ही महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी बांधव विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.