विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाला लागावे : शिक्षणाधिकारी काळे
सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या उन्हाळी वर्ग भेट
पहूर, ता. जामनेर : विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून अभ्यासाला लागावे, अभ्यासाचे नियोजन करून त्यात सातत्य ठेवल्यास हमखास यश प्राप्त होते, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे यांनी केले. येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सुरू करण्यात आलेल्या एसएससी उन्हाळी वर्गास त्यांनी आज भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू काळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी शाळेने उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरू केलेल्या इयत्ता दहावीच्या उन्हाळी वर्गाविषयी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शाळा आणि संस्थे बद्दल गौरवोद्गार काढले. तसेच पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. प्रारंभी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ . प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय देशमुख यांनी भूषविले. याप्रसंगी आर. टी. देशमुख, बी. एन. जाधव, प्रकाश जोशी, सुनिल पवार, संजय बनसोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आकांशा जाधव, सुजाता देशमुख, कांचन घोंगडे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक प्रतिनिधी शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले. पायल पाटील हिने आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.