कोरोना झाल्यानंतर तीन महिन्यांनी पुढचा डोस घेता येईल ; केंद्राने केले स्पष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंधरा वर्षांखालील मुलांचे लसीकरण केव्हा सुरू केले जाणार, हा प्रश्न पालकांना पडला असून याबाबत गुरुवारी केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोना झाल्यानंतर किती महिन्यांनी पुढचा डोस घेता येईल याबाबतही यावेळी माहिती देण्यात आली.
भारतात पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून मार्च महिन्यात १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) आणि कोविड टास्क फोर्स प्रमुख डॉ. व्ही. के. पॉल यांनी महत्त्वाची माहिती दिली. १२ ते १४ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणाबाबतचा निर्णय वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर घेतला जाईल. याबाबत विचारविनिमय सुरू आहे, असे पॉल यांनी स्पष्ट केले.
..तर तीन महिन्यांनंतर पुढचा डोस घेता येईल
एखाद्या व्यक्तीला कोरोना संसर्गाची लागण झाल्यास त्यानंतर किती महिन्यांनी लसचा दुसरा वा ‘प्रीकॉशन डोस’ घेता येईल, असे विचारले असता तीन महिन्यांनंतर असा डोस घेता येईल, असे पॉल यांनी सांगितले. राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार गट याबाबत सातत्याने आढावा घेत असतो. त्यात काही बदल करायचे असतील तर त्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे पॉल यांनी नमूद केले.