भरधाव कार डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात ; एका जणाचा जागीच मृत्यू
अंबरनाथ : अंबरनाथमधील लोकनगरी बायपास रस्त्यावर एर्टीगा कार डिव्हायडरला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका जणाचा जागीच मृत्यू तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
माहितीनुसार, अंबरनाथच्या लोकनगरी बायपास रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी एर्टीगा कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरला धडकली. कारचा स्पीड प्रचंड असल्याने डिव्हायडरला धडकताच ती जाग्यावर उलटली. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अपघात इतका भीषण होता की, या घटनेत एकाचा जागीच मृत्यू तर पाचजण गंभीर जखमी झाले.
जखमी झालेल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारासाठी मुंबई येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.