मनपा अधिकार्यांना अवैध धंदे करण्याचा संतप्त सल्ला कुणी दिला?
धुळे (निखिल जुनागडे) मनपा अधिकार्यांनो तुम्हाला पैसेच कमवायचे असतील तर तिकडे खुशाल अवैध धंदे करा पण शहरातील नागरीकांना वेठीस धरू नका! अशी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया माजी उपमहापौरांनी व्यक्त केली असल्याने त्याबाबत शहरात सर्वत्र चर्चा होत आहे.
शहरात प्रभाग क्रमांक चौदा हा माजी उपमहापौर व मजबूत नगरसेवकांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो मात्र या प्रभागातच समस्यांचा डोंगर असून मनपाने हा परिसर वाळित टाकला आहे की काय ? असा प्रश्न आता शहरातील नागरिक विचारू लागले आहेत. या परिसरात पत्रकार कॉलनी नावाची एक वस्ती आहे. गेले दोन ते अडीच महिने या परिसरातील स्ट्रीट लाईट पूर्णतः बंद आहेत. येथील नागरिकांनी मनपा विद्युत विभागात भरपूर तक्रारी केल्या. हवे तेवढे फोन केले. पाठपुरावा केला पण विद्युत विभाग जागचा हलला नाही. शहरात नवीन एलईडी बसविण्याचे काम सुरु आहे . मात्र पत्रकार कॉलनी त्यातून वगळण्यात आली आहे काय? हा प्रश्न निर्माण झाला आहे. या वस्तीत एक इलेक्ट्रिक पोल पूर्णतः झुकला आहे . केव्हा पडेल सांगता येत नाही. त्याबाबत ही ढिगभर तक्रारी झाल्या आहेत . पण उपयोग नाही . या कॉलनीत चाळिस वर्षा पूर्वीची अवघी 3 इंची पाईप लाईन आहे. त्यानंतर भरपूर कनेक्शन वाढले. परिणामी शेवटच्या डेड एन्ड च्या घरांना पाणी सोडल्यावर एकतास भर पाणीच येत नाही . डेड एन्ड चे पाच सात नळ कोरडेच असतात. अनेक वर्षांची ही समस्या आहे. आधीच्या मंडळींचे पाणी भरून झाले व काहींचे गटारीत वहायला लागले की मग हे पाणी डेड एन्ड च्या कनेक्शन पर्यंत पोहोचते.
प्रभाग चौदामध्ये सर्वत्र समस्याच समस्या आहेत. या समस्यांना वैतागून नगरसेविका सौ. कल्याणीताई अंपळकर व मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या शिष्टमंडळाने मनपा अधिकार्यांना भेटून निवेदन दिले. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, अधिकार्यांच्या अक्षम्य हलगर्जीपणाचा फटका जनतेला भोगावा लागतो. तुम्हाला पैसे च कमवायचे असतील तर अवैध धंदे करा. पण जनतेला वेठीस धरू नका. जनतेची कामे झाली नाहीत तर गंभीर परिणाम भोगा, असा इशाराच त्यांनी दिला आहे. त्यांनी जनतेच्या विविध कामांबाबत या निवेदनात यादीच दिली आहे. एवढी तीव्र प्रतिक्रिया माजी उपमहापौर यांनी दिल्या नंतर तरी या नाठाळ यंत्रणेवर काही परिणाम होईल की नाही? याबाबत धुळेकरांत उत्स्तुकता आहे.