जीवनातील तणाव दूर करण्यासाठी विडंबन आवश्यक : कवी विलास पाटील
चोपडा (विश्वास वाडे) पंकज कला व विज्ञान महाविद्यालय, चोपडा येथे दि. १४ ते दिनांक २८ जानेवारी २०२२ या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आयोजित करण्यात आला आहे. त्यात सोमवार दि. १७ जानेवारी २०२२ रोजी विलास पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे तर प्रमुख मार्गदर्शक मा विलास पाटील हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. किशोर पाठक यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. तसेच मराठीचा वापर हा मोठ्या प्रमाणात व्हावा अशी अपेक्षा केली. तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक मा विलास पाटील यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून विडंबन कविता व वात्रटिका सादरीकरण केले. त्यांनी सांगितले की, जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी विडंबन आवश्यक आहे. विडंबनाच्याद्वारे माणसाच्या जीवनात हास्य निर्माण करता येते. निरोगी जीवनासाठी विडंबन व हास्य दोन्ही महत्त्वाचे आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांनी काही विडंबन कविता सादर केल्या व त्यातून विद्यार्थ्यांची मने जिंकली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महादेव वाघमोडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सांगितले की, मराठी भाषा समृद्ध आहे. ही भाषा टिकवणे काळाची गरज आहे. मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडयात केवळ मराठीचा वापर न करता जास्तीत जास्त मराठीचा वापर करावा. डॉ महादेव वाघमोडे यांनी एक विडंबन कविता सादर करून त्यातून शेतकऱ्याचे दुःख वर्णन केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ किशोर पाठक यांनी तर आभार प्रा अरुण मोरे यांनी मानले.