शिंदखेडा येथील एस.टी. महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे क्यू आर कोड उपलब्ध करून द्यावा ; ग्राहक पंचायतची मागणी
शिंदखेडा (यादवराव सावंत) कॅशलेस व्यवहारासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने प्रत्येक वाहकाकडे क्यू आर कोड उपलब्ध करून द्यावा अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा शिंदखेडा ने केली आहे .याबाबतचे निवेदन आज शिंदखेडा आगार प्रमुख निलेश गावित यांना दिले. वरिष्ठ स्तरावर ही मागणी पोहोचवून कॅशलेस व्यवहाराची सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करुन द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी पदाधिकाऱ्यांनी केली
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्याचे जग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जग आहे या तंत्रज्ञानाचा उपयोग सर्वत्र केला जातो. कॅशलेस व्यवहार सध्या प्रचलीत झाला आहे. केंद्र सरकारने कॅशलेस व्यवहार करणे बाबत आग्रह धरला आहे त्याला अनुसरूनच अगदी चणे फुटाणे विक्रेत्यांपासून मोठे दुकानदार आणि व्यवसायिकां पर्यंत क्यू आर कोड चा वापर केला जात आहे. याला अपवाद मात्र एसटी महामंडळ ठरले आहे अद्यापही एसटी महामंडळात कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. परिणामी अनेक प्रवाशांकडे लागणाऱ्या भाड्यासाठी संबंधित रक्कम, सुट्ट्या पैशांच्या स्वरूपात उपलब्ध नसते आणि तीच तीच बाब वाहका बाबतीत घडते. सुट्टे पैसे देण्या घेण्यावरून अनेक वेळेला वाद होतात. हे वाद विकोपाला जाऊन त्यातून मारामारी होते. आणि पोलिस स्टेशन पर्यंत हा वाद जात असतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने संपूर्ण राज्यात प्रत्येक वाहकाकडे कॅशलेस व्यवहारासाठी आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी , तसेच ॲडव्हान्स बुकिंग करताना आणि विनाथांबा गाड्यांसाठी बुकिंग करताना क्यू आर कोड उपलब्ध करून द्यावा. यातून संबंधित अधिकारी, वाहक आणि प्रवासी यांच्या मधिल वाद थांबतील आणि एसटीच्या कर्मचाऱ्यांची तसेच प्रवाशांची डोकेदुखी थांबेल असे निवेदनात म्हटले आहे. ही मागणी वरिष्ठांपर्यंत पोहोचवून लवकरात लवकर क्यू आर कोड उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी पंचायतीचे जिल्हा संघटक प्रा.चंद्रकांत डागा तालुकाप्रमुख प्रदीप दीक्षित, सचिव गजानन शास्त्री ,संघटक प्रा. योगेंद्र सनेर, सह संघटक प्रा.अजय बोरदे, सदस्य रवींद्र ठाकूर, भीमराव कढरे, भैय्या मंगळे ,जितेंद्र मेखे, नलिनी वेताळे, एड. वसंतराव भामरे, संजय पारख अशोक राखेचा, मनोज वारुडे , छायाताई पवार, विजयाताई भावसार आदी उपस्थित होते.