‘जि.प.’च्या माजी अध्यक्षांनी हाती बांधले शिवबंधन
नगर विकास मंत्री शिंदे, पर्यावरण मंत्री ठाकरे आणि राज्यमंत्री सत्तार यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश
सिल्लोड (विवेक महाजन) औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जि.प.तील काँग्रेसचे विद्यमान गटनेते श्रीराम महाजन यांनी हातावर शिवबंधन बांधले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्य महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाजन यांच्यासह काँग्रेस आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी औरंगाबादचे जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदींसह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केल्याची भावना महाजन यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आगामी काळात जिल्ह्यात पक्ष संघटनासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यांनी केला प्रवेश
औरंगाबाद जिल्ह्यातील कॉंग्रेस आणि भाजपच्या पाच पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यात औरंगाबाद जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा काँग्रेसचे विद्यमान गटनेते श्रीराम महाजन, भाजपचे भराडी येथील सरपंच पप्पू जगनाडे, उपसरपंच गजानन महाजन, विजय सिंगवी आणि दिनेश बिसेन यांनी हातात शिवबंधन बांधले.