नागपुरात 3 दिवसांत उष्माघाताचे 4 बळी?
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेनं (Heat Wave) थैमान घातलं आहे. त्यामुळे नागपुरातील पाराही चढाच आहे. याच उष्णतेच्या लाटेनं नागपुरात 3 दिवसांत तब्बल 4 बळी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नागपुरसह विदर्भात कडक उष्णतेची लाट सुरू असून मागच्या ३ दिवसांत उष्माघाताने नागपुरमध्ये 4 नागरिकांचा बळी घेतल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सक्करदरा, इमामवडा, अजनी आणि सदर परिसरात चार अनोळखी व्यक्तींचा मृतदेह आढळला. प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतर उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली गेली आहे.
नागपूर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढच्या दोन दिवसांमध्ये नागपूरसह विदर्भामध्ये मान्सूनपूर्व पाऊस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना या उष्माघातापासून काहीसा दिलासा मिळेल असा अंदाज नागपुर वेधशाळेने व्यक्त केला आहे.