कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात रणजीत भोसलेंनी दिल्ली येथे शरद पवारांची घेतली भेट
धुळे (प्रतिनिधी) धुळे कॉरिडॉर विकास समितीचे प्रमुख रणजीतराजे भोसले यांनी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. शरदचंद्र पवार यांची धुळ्यातील कॉरिडॉर प्रकल्पासंदर्भात भेट घेतली. व कॉरिडॉर प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा केली.
धुळ्यातील कॉरिडॉर DMIC प्रकल्पाचे काम लवकर सुरु करावे तसेच त्या संदर्भात दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीचे नियोजन करावे अशी मागणी रणजीत राजे भोसले यांनी पवार यांच्याकडे केली. शरदचंद्र पवार यांनी रणजीत राजे भोसले यांच्या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरात लवकर उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसेच यावेळी शरदचंद्र पवार यांनी या संदर्भात लवकरच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संबंधित लोकांची भेट घेवून बोलतो. आणि धुळे व महाराष्ट्रातील या प्रकल्पाच्या कामाला चालना देण्याचा प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.
धुळे शहर व जिल्हयाचा समावेश दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्प (DMIC) अंतर्गत करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पांला प्रांरभिक मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्पांना परकीय गुंतवणूकीसाठी मदत होणार असून परकीय देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होवून रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. धुळे शहरालगत दहा गावांच्या हद्दीतील ६ हजार हेक्टर (१५ हजार एकर) जमीनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
कॉरिडॉर प्रकल्प विकास समिती ही गेल्या सहा वर्षांपासून धुळे-दिल्ली-मुंबई कॉरिडॉर प्रकल्पासाठी काम करीत आहे. समितीने विविध प्रकारचे आंदोलन केलेले आहेत. सदर प्रकल्प लवकरच मार्गी लागेल अशी आशा सर्वांना आहे. याच संदर्भात रणजीत राजे भोसले व समितीचे सर्व सदस्य कार्यरत आहेत.