मुंब्र्यात राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लावलेला बॅनर फाडला ; तणाव वाढला !
ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 54 वा वाढदिवस आहे. दरम्यान, मुंब्र्यात पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला डिवचण्याचा प्रकार समोर आल्यानं गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. मुंब्र्यात राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे बॅनर फाडल्याने तणाव निर्माण झाला आहे.
एकीकडे नुपूर शर्मा वादामुळे समस्त मुस्लिम समाज हिंसक आंदोलन करत असतानाच मुंब्र्यात पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या मनसेला डिवचण्याचा प्रकार समोर आल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. 14 जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी जागोजागी आपल्या नेत्याला शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या मुंब्रा येथे देखील इरफान सय्यद या मनसैनिकाने आपल्या नेत्याचे अभिष्टचिंतन करणारे बॅनर लावले. मात्र नुराणी हॉटेल समोर भररस्त्यात लावलेल्या बॅनर ला अज्ञात इसमांनी फाडल्याची घटना घडल्यानं तणाव निर्माण झाला.
याआधी देखील मुंब्रा कौसा भागात असणाऱ्या मनसे कार्यालयावर अज्ञात व्यक्तींद्वारे दगडफेक करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आता परत तसाच प्रकार झाल्याने संतापलेल्या मनसैनिकांनी मुंब्रा पोलिसात धाव घेऊन हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली. हिंमत असेल तर पाठून कारस्थान न करता समोरून विरोध करा असा इशारा इरफान सय्यद यांनी दिला.