‘त्या’ बलात्कार प्रकरणी रितेश देशमुखची कठोर कारवाईची मागणी ; जाणून घ्या..नेमकं प्रकरण काय?
मुंबई (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात सामूहिक बलात्काराची तक्रार करण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर पोलीस ठाण्यातही बलात्कार झाल्याचा आरोप आहे. अभिनेता रितेश देशमुखनं यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. यांच्यावर तात्काळ कारवाई करून कठोरात कठोर शिक्षा द्या…अशी मागणी रितेशनं केली आहे.
रितेश देशमुखने नुकतंच त्याच्या अधिकृत ट्विटवर एक ट्विट केले आहे. यात त्याने एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्याने उत्तरप्रदेशात घडलेल्या धक्कादायक घटनेबाबतही भाष्य केले आहे. याबाबत तो म्हणाला, “जर हे खरं असेल तर यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही. जर रक्षकच भक्षक झाला तर सर्वसामान्य माणसाने न्याय मागण्यासाठी कुठे जायचे? अशा लोकांना भरचौकात सर्वांसमोर मारायला पाहिजे. त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत कठोरात कठोर शिक्षा द्या”, अशी मागणी रितेशने केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ललितपूरमधील एका अल्पवयीन मुलीला चार जणांनी २२ एप्रिल रोजी भोपाळला नेले आणि तीन दिवस तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर या आरोपींनी या मुलीला ललितपूरमधील पाली पोलीस ठाण्याजवळ आणून सोडले. ही मुलगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली. त्यानंतर तिथे पोलीस ठाण्याचा प्रमुख तिलकधारी सरोज याने तिला एका खोलीत डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. हे प्रकरण वरिष्ठांकडे गेल्यानंतर हा ठाणेदार फरार झाला. पोलिसांनी या मुलीवर बलात्कार करणाऱ्या चार जणांना अटक केली. या मुलीच्या मावशीलाही सहआरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. फरार झालेल्या सरोजला प्रयागराज येथून अटक करण्यात आली़. या प्रकरणी स्टेशन प्रमुखासह ६ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली होती.