विटी -दांडू, गोट्यांची ‘धूम’ शिंदखेडा येथील रोटरीच्या उपक्रमात पारंपारीक खेळात रमले चिमुकले !
शिंदखेडा (यादवराव सावंत) आज घडीला लहानांपासून मोठयांपर्यंत प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे. स्मार्ट नसलेला विद्यार्थी तसा आजच्या जगात दुर्मिळच सापडणार आहे. स्मार्ट फोन व युवक असे एक अतूट नाते निर्माण झाल्याचे चित्र समाजात मोठ्या प्रमाणात दिसत आहे.
अनेक महाविद्यालयांच्या पटांगणावर विद्यार्थी मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसलेले व गेम खेळताना दिसतात अशा परिस्थितीत विटी-दांडू, गोट्या-गोट्या, सापसीडी, आट्यापाट्या, भोवरा, लंगडी पळी, आबा-धुबी, लगोरी, संगीत खुर्ची, लिंबू चमचा अशा मैदानी खेळांपासून आजचे विद्यार्थी व युवक फारच लांब आहेत. या खेळा विषयी विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी शिंदखेडा येथील रोटरी क्लबतर्फे धमाल गल्ली चे आयोजन करण्यात आले होते. येथील श्री स्वामी समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रा गोपालसिंह परमार यांनी भारताचे दहावे प्रधानमंत्री भारतरत्न स्व अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त प्रतिमपूजन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
सुरुवातीस सूर्यनमस्कार व त्यानंतर संगीताच्या तालावर झुम्बा डान्सवर विद्यार्थ्यांनी ठेका धरला. या उपक्रमात जुन्या काळातील गल्लीत खेळल्या जाणाऱ्या खेळांचा समावेश करण्यात आला होता गोटया- गोटया, भोवरा, आट्या-पाट्या, टायर – टायर, आबा -दुबी, लगोरी, दोरीवरील उड्या, सापसीडी, लंगडी पळी, गोणपाट शर्यत, तीन पायांची शर्यत, लिंबू चमचा शर्यत, स्लो सायकलींग, संगीत खुर्ची व जिलेबी शर्यत अशा अनेक मजेशीर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. सुमारे तीनशे विद्यार्थी आणि पालकांनी या खेळांचा आनंद घेतला. हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष प्रा.गोपालसिंह परमार प्रोजेक्ट चेअरमन संजयकुमार महाजन, संजय पारख, देवेंद्र नाईक, सुमित जैन, जितेंद्र जैन, विनोद जैन, सुधीर शिंपी यांनी विशेष परिश्रम घेतले रोटरीच्या या अभिनव उपक्रमाचे परिसरात जोरदार कौतुक होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना मोबाईलच्या गेम पासून लांब ठेवण्यासाठी हा उपक्रम घेण्यात भागवत अनेक दिवसापासून प्रयत्न होता विद्यार्थ्यांचा शारीरिक व्यायाम होऊन त्यांना मैदानी खेळांविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ शिंदखेडा यांनी धमाल गल्ली चे आयोजन केले होते असे मत प्रोजेक्ट चेअरमन संजयकुमार महाजन यांनी प्रतिपादित केले.
यात अनेक विद्यार्थ्यांनी खेळाचा आनंद लुटला. विविध खेळामधील स्पर्धेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षसेही देण्यात आली. नैतिक जैन या विद्यार्थ्याने त्याच्या मनोगतात सांगितले की आम्ही विद्यार्थी आज मोबाईलच्या गेम मध्ये अडकलो आहोत. मैदानापासून आम्ही फार लांब आहोत .त्यामुळे मैदानी खेळांची आवड निर्माण होण्यासाठी रोटरी क्लब शिंदखेडा यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात आम्ही खूप धम्माल केली व मैदानावर विविध खेळांचा आनंद लुटला या खेळामुळे आम्हाला काही वेळासाठी घरची देखील आठवण आली नाही. आम्ही खूपच खुश आहोत. मोबाईल गेम पासून लांब राहून विविध मैदानी खेळ खेळण्याचा संकल्प मी व माझ्या सवंगड्यांनी आज पासून केलेला आहे.