ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू
धुळे (प्रतिनिधी) ओमिक्रॉन विषाणूचे वाढते संक्रमण लक्षात घेता त्याचा प्रसार रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी विवाह समारंभ, सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांबरोबरच अंतिम संस्कारासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना त्यांनी यंत्रणा तसेच नागरीकांना दिल्या आहेत.
जिल्ह्यात विवाह समारंभ बंद अथवा मोकळ्या जागेत आयोजित करतेवेळी जास्तीत ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा पाळण्यात यावी, त्याचबरोबर अन्य सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये जेथे लोकांची सतत उपस्थिती राहील असे कार्यक्रम बंद अथवा मोकळ्या जागेमध्ये आयोजित करतांना उपस्थितांची कमाल मर्यादा ५० व्यक्तीपर्यंत राहील. तसेच अंतिम संस्कारांच्या बाबतीत उपस्थितांची संख्या जास्तीत जास्त २० लोकांपर्यंत मर्यादित राहील. या निर्बंधाच्या मधल्या कालावधीत काही सुचना नव्याने प्राप्त झाल्यास त्याचेही अनुपालन करावे लागेल, असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी प्रसिध्दीस दिलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.