ठिले गावात झाली लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांची चोरी
शहापूर : केव्हा कशाची चोरी होईल हे सांगता येत नाही भामटे विविध प्रकारच्या चोऱ्या करत असतात. सध्या फळबागा लागवडीस पूरक वातावरण असल्यामुळे शेतकरी फळबागांची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहेत. ठिळे (तालुका शहापूर) येथील ज्येष्ठ नागरिक रामचंद्र नारायण ठाकरे यांनी आपल्या शहापूर-मुरबाड या रस्त्यालगत असलेल्या सर्व्ह क्रमांक 121/ब या जागेवर हिरव सोनं जपण्यासाठी दोन-तीन दिवस स्वतः मेहनत करून आंबे लागवडीसाठी 62 खड्डे खोदून त्यात गुरुकृपा शासकीय नर्सरी अस्नोली यांच्याकडून स्वखर्चाने रोपे आणून लावली. व या हिरव्या सोन्याला पोटच्या पोरापेक्षा जास्त जीव लावला. म्हतारपणात मन रमविण्याठी आणि हाडामासाच्या शेतकऱ्याचा छंद जोपासण्यासाठी त्या झाडांची काळजी घेऊ लागले.
अशातच या हिरव्या सोन्यावर चोरट्यांची नजर पडली आणि दिनांक २६ जून २०२२ च्या मध्यरात्री चोरट्यांनी आपला डाव साधत जीव लावलेल्या ६२ आंब्याच्या झाडापैकी २८ झाडे मुलासकट उपटून चोरून नेली. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतावर फेरी मारण्यासाठी रामचंद्र ठाकरे गेले असता त्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच जवळच्या वासिंद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध भदावी कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे.
रोपं चोरीला गेल्यामुळे शेतकरी रामचंद्र ठाकरे हावालदिल झाले आहेत. लागवडीसाठी केलेली मेहनत वाया गेली व आर्थिक नुकसान देखील त्यांना सोसावे लागले.