उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय ; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर शिक्कामोर्तब!
मुंबई : गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विचाराधीन होता. एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. मात्र, यावरून स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवल्यानंतर अखेर उद्धव ठाकरेंनी याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याची माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे. विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याला होकार असल्याचं सांगितलं आहे.
भूमिपुत्रांची इच्छा होती. ती इच्छा आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली आहे. आम्ही अनेकदा विनंती केली होती, पत्र पाठवलं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व समाजाच्या लोकांना मातोश्रीवर बोलवलं आणि तुमची जी इच्छा आहे, भावना आहेत, त्यांचा सन्मान राखून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं निश्चित केलं”, अशी माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्ताने एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.