‘…त्याच्या अहंकाराचाही अंत होणं निश्चित’ : कंगना रणौत
मुंबई : उद्धव ठाकरे यांनी बुधवारी २९ जून रोजी जनतेशी संवाद साधत आपण राजीनामा देत असल्याचं घोषित केलं. त्यानंतर याबाबत सोशल मीडियाद्वारे लोकांनी व्यक्त होण्यास सुरुवात केली. आता अभिनेत्री कंगना रणौतने देखील आपलं मत मांडलं आहे.
राजकीय वाद असो वा एखादी घटना कंगना आपलं मत स्पष्टपणे मांडताना दिसते. आता देखील तिने १ मिनिटाचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून कंगनाने पुन्हा एकदा शिवसेनेबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. शिवाय हनुमान चालीसाविषयी देखील कंगणाने स्पष्ट बोलणं पसंत केलं. तिचा या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
काय म्हणाली कंगना रणौत?
“१९७५नंतर आताचा काळ हा भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण आहे. १९७५ मध्ये लोकनेते जेपी नारायण यांनी ‘सिंहासन खाली करा’ असं म्हंटल्यानंतर सिंहासन पडलं होतं. २०२०मध्ये मी म्हटलं होतं की, लोकशाही हा एक विश्वास आहे आणि सत्तेच्या अहंकारामुळे जो हा विश्वास तोडतो, त्याच्या अहंकाराचाही अंत होणं निश्चित आहे. ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीची शक्ती नाही, ती एका खऱ्या चारित्र्याची शक्ति आहे.”
पुढे बोलताना ती म्हणाली, “हनुमानजी यांना भगवान शंकराचा बारावा अवतार मानलं जातं. शिवसेनेने जर हनुमान चालिसावरच बंदी आणली तर, त्यांना भगवान शिव देखील वाचवू शकणार नाही. हर हर महादेव, जय हिंद जय, महाराष्ट्र” कंगनाने या व्हिडीओला दिलेलं कॅप्शन देखील लक्षवेधी आहे. ते कॅप्शन म्हणजे, “जेव्हा पाप वाढतं तेव्हा विनाश होतोच आणि सृष्टीची निर्मिती होते. आयुष्याचे कमळ फुलते.”