चिलाणे येथे राष्ट्रवादीची बैठक संपन्न
मालपुर (गोपाल कोळी) आज शिंदखेडा तालुका चिलाणे येथे गावात उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी- आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी- प्रभावी/प्रगल्भ/तरुण/पुरोगामी विचारांसाठी’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष नानासाहेब किरण शिंदे यांच्या नियोजनात तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार तात्यासाहेब रामकृष्ण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही बैठक संपन्न झाली.
शिंदखेडा तालुक्यात असं एकही गाव नाही जिथे शरदचंद्र पवार यांच्या विचारांना मानणारा वर्ग नाही. माणसाने आयुष्यात काय कमावले पाहिजे तर ती माणसे हे पवार यांनी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या माणसांच्या धनामुळे सिद्ध केले आहे. पवार यांच्या विचारांची वैचारिक शिदोरी आपल्याकडे आहे. ती शिदोरी जिल्हातील तथा तालुक्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारधारेने प्रत्येक कार्यकर्ता प्रेरीत झाला पाहिजे. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी या कार्यक्रमावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी सहकारी कार्यकर्ते तथा महीला यांच्या सोबत संवाद साधला. त्यांनी मांडलेल्या समस्यांची नोंद घेतली असुन त्या समस्या लवकर कसे सोडवले जातील यासाठी आम्ही प्रयत्नशिल राहू .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशाचे नेते खा. शरद पवार यांचे नेतृत्व लाभलेले आहे. आपल्या पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करायची आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घेऊन वैचारिक देवाणघेवाण करावी, आपल्या गावाचा विकास कसा होईल यासाठी विचारमंथन करावे. आपला पक्ष हा शिस्तप्रिय आहे, या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त रुजली पाहिजे यासाठी प्रयत्न आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष दीपक जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मयुर बोरसे-पाटील, किसान सेलचे गुलाबराव पाटील, संगीता ताई पाटील, युवक तालुकाध्यक्ष चिराग माळी, भुषण पाटील, ग्रंथालय सेलचे तालुकाध्यक्ष भिका पाटील, जिल्हा प्रवक्ते योगेश पाटील, समता परिषदेचे भैय्या चौधरी ,शाम पाटील आदी उपस्थित होते.