झेंडावंदन करताना काँग्रेसचा ध्वज खाली पडतो तेव्हा..
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसच्या १३७ व्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला आज गालबोट लागले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी झेंडावंदन करत असताना काँग्रेसचा ध्वज न फडकता अचानक त्यांच्या हातावर येऊन पडला.
काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात आज एका कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. झेंडावंदनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ होणार होता. सोनिया गांधी झेंडावंदन करत असताना अचानक झेंडा त्यांच्या हातावर येऊन पडला, त्यामुळे खळबळ उडाली. झेंडा खांबाला निट बांधला गेला नसावा, असे वाटून पुन्हा तो बांधण्याचा प्रयत्न करण्यात आला. काँग्रेस सेवादलाच्या कार्यकर्त्यांने खांबावर चढून दोनदा काँग्रेसचा झेंडा बांधण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला, त्यामुळे काँग्रेसचा झेंडा काही फडकलाच नाही.
झेंडावंदनाचा प्रयत्न अर्धवट सोडून सोनिया गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. देशाचा मजबूत पाया कमजोर करण्याचा प्रयत्न आज सरकारतर्फे केला जात आहे, इतिहासाला खोटे ठरवत आमची प्राचीन अशी गंगा यमुना संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. लोकशाही आणि संविधान धाब्यावर बसवत देशात हुकुमशाहीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, यामुळे देशातील नागरिकांना असुरक्षित वाटत आहे, त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण झाली आहे. मात्र, देशातील सर्वसामान्य जनतेच्या तसेच लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस सदैव संघर्ष करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. समाजविरोधी आणि देशविरोधी शक्तींविरोधात संघर्ष करताना वेळ पडली तर बलिदान करायलाही काँग्रेसचे कार्यकर्ते मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
समाजमाध्यमांवरील प्रतिकिया
समाजमाध्यमांवर याबाबतचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी काँग्रेसची खिल्ली उडवली. जो पक्ष स्वत:चा झेंडा सांभाळू शकत नाही, तो देश कसा सांभाळणार, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या, तर काहींनी या घटनेकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले. सोनिया गांधींनी पक्षाचा झेंडा खाली पडू दिला नाही. याचाच अर्थ पक्ष सांभाळण्याची क्षमता केवळ त्यांच्यातच आहे, असे मत या लोकांनी व्यक्त केले.