महाराष्ट्र

लोकांनी केला लोकशाहीचा नाश !

जळगाव : राजेशाही शासनपद्धती, हुकुमशाही शासनपद्धती जाचक असते.निरंकुश असते.सभ्य असली तर ठिक पण असभ्य असली तर लोकांचे जिणे हराम करते.असा अनुभव आला आहे.आजही येत आहे,काही देशांत.म्हणून लोकशाही सर्वात उत्तम मानली गेली.कारण त्यात लोक सरकार निवडतात,बनवतात,बदलतात,नाकारतात.असा अनुभव भारतात १९७७ आणि २०१४मधे आलेला आहे.असे करणे हिच लोकशाहीची खरी ओळख आहे.

लोकशाही नसली तर नोकरांची मुजूरी वाढते.व्यापारी परिस्थितीशी जुळवून घेतात. शेतकरी,मजूर यांची दैना होते .असे असतांनाही शेतकरी आणि मजूर हे लोकशाही जतन करीत नाहीत.असे वास्तव आहे.मुळातच या कष्टकरी वर्गासाठी लोकशाही ची खूप गरज आहे.यांच्या मताला महत्त्व दिले आहे.यांच्या मतांनी सरकारमधे जाणारा आमदार खासदार निवडून देता येतो.तरीही शेतकरी आणि मजूरांना आपल्या मताचे मुल्य कधीच कळले नाही.मताचा अधिकाराचे महत्त्व कधीच कळले नाही.म्हणून नाममात्र पैसे घेऊन मत विकून मोकळे होतात.आपले मत विकत घेऊन निवडून आलेला आमदार खासदार किंवा सरकार जेंव्हा जुलूम करते तेंव्हा सुद्धा या वर्गाला आपली चूक कळत नाही.आता चूक झाली, पुन्हा नाही करणार.असे वाटत नाही.म्हणून पुन्हा पुन्हा तेच करतात,जे करायला नको.

जळगाव असो किंवा धरणगाव, पाचोरा,अमळनेर,चोपडा,धुळे सर्वत्र मतविक्रीचे प्रमाण मोठे आहे.या मतविक्रीतून अनेक अवैध व्यवसायिक,गु़ंड, गुन्हेगार निवडून येतात.म्हणून दारु विक्रेते, रेतीमाफिया, भूमाफिया, सट्टा, झन्नामन्ना वाले, अवैध सावकार, मक्तेदार असेच लोक निवडून येतात.निवडून आल्यानंतर हिच माणसे शेतकरी व मजुरांवर जुलूम करतात.तेंव्हा अधिकारी व समाजसेवकांकडे दाद मागतात.आधिकारी आमदार खासदाराच्या दबावाखाली असतो.तो हतबल होतो.समाजसेवक लढून लढून पोलिस व कोर्टाच्या फेऱ्यात अडकतो.जळगांव जिल्ह्यातील तहसीलदार, कलेक्टर,बीडीओ,सीईओकडे असे लाखो तक्रारी पडून आहेत.काहीही कारवाई होत नाही.कारण याच तक्रारदार शेतकरी व मजुरांनी गुंड, गुन्हेगारांना निवडून देऊन अधिकाऱ्यांच्या उरावर बसवलेले असते.ते आमदार खासदार आधिकाऱ्यांना लोकहिताची कामे करू देत नाहीत.असे अनेक आधिकाऱ्यांचे उत्तर मिळाले आहे.

धरणगाव तालुक्यातील नांदेडच्या घरकुल पात्र लाभार्थ्यांना दोन वर्षे लढूनही आमदाराने घरकुल मिळू दिले नाही.पारोळा तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदाराने बोंडअळीची नुकसानभरपाई मिळू देण्यात अडथढा आणला होता.पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कापूस विकला आणि व्यापारी पळून गेला.शेतकऱ्यांनी तेरा दिवस मंदिरावर सत्याग्रह केला.आमदारांनी तेरा दिवसांनी तेरा मिनीटे हजेरी लावली.जळगांव तालुक्यातील आमोदे बु.येथील शेतकरी विधवेला मिळणारा चेक आमदाराच्या हस्ते देण्यासाठी तहसीलदाराने तीन महिने अडवून धरला होता.अमळनेर च्या आमदाराने कांद्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळू दिले नाही.म्हणे तो निर्णय भाजप काळातील आहे.

आता जळगाव जिल्हा परिषद ची निवडणूक येत आहे.यात एकही शेतकरी व मजुरांचा नेता नाही.सर्वच मक्तेदार बोकड,बोगणं,बाटली घेऊन तयार आहेत.यांच्याकडे पैसा आहे.हे वाटणार.जेवण देणार.दारू पाजणार.मताचे पैसे वाटणार.शेतकरी व मजूर यांना मतदान करणार.हेच जिल्हा परिषद सदस्य निवडून येणार.पुन्हा रस्ते,शाळा,गटारी,मुतारी,खडी,रेती,पोषण आहार,शाळेचा गणवेश यांचे मक्ते घेणार.शेतकरी व मजूर आपल्या हक्कासाठी लढाई करणार.तेव्हा हे दुर्लक्ष करणार.जसे आजपर्यंत करीत आले आहेत.

आम्ही जिल्हा परिषद समोर शेतकरी व मजूरांच्या हक्कासाठी आंदोलने केलीत.जिल्हा परिषद चे अध्यक्ष व आजी माजी सदस्य यांनी कधीच विचारपूस केली नाही.मदत केली नाही.फक्त सदस्य श्री नानाभाऊ महाजन यांनी दखल घेतली.मदत केली.आम्हाला कळले कि,हे मक्तेदार नाहीत.माफिया नाहीत.म्हणून त्यांना शेतकऱ्यांची,मजूरांची,मतदारांची जाणिव आहे.त्यांच्या मनावर पैशांचा बोझ पडला नाही.

अवैध धंदे करणारे,धंनदांडगे ओळखून आहेत कि, शेतकरी व मजुरांना पांच वर्षे मदत करू नका.फक्त मतासाठी दारू,मटण,पैसे दिले कि आपण सहज निवडून येतो.शेतकऱ्यांना,मजुरांना असेच खितपत ठेवले तरच ते आपली दारु घेतील,मटण खातील,पैसे घेतील आणि मत देतील.ते सक्षम झाले,हुषार झाले तर आपण निवडून येणार नाही.

शेतकरी आणि मजूर सक्षम नसले, हुषार नसले तरी त्यांची मुले आता सक्षम झाली आहेत.हुषार झाली आहेत.पेपर वाचतात.टिव्ही पाहातात.सोशल मेडियाचा चांगला वापर करतात.आपले मत मांडतात.प्रतिसाद देतात.इग्लंड अमेरिकेच्या गोष्टी करतात.तर आता अपेक्षित बदल घडण्याची शक्यता आहे.जे पुढारी फक्त सेवाभावी नेतृत्व करतात त्यांना ओळखतात,जाणतात.त्यांनाच मतदान करण्यासाठी प्रचारमोहिम,संवादमोहिम चालवली पाहिजे.जे रस्ते,रेती,गटार,शाळा, बांधकाम,खडी,दारू चे व्यवसायिक आहेत त्यांना सुद्धा ओळखून आहेत.तर अशा धनदांडग्यांना जे आमचे आणि आमच्या भोळ्या शेतकऱ्यांचे ,मजुरांचे मत खरेदी करतात ,अशांना मतदान होऊ नये, मतदान करू नये,अशी खबरदारी घेतली पाहिजे.नेता आणि मक्तेदार यात फरक केला पाहिजे.नेता आणि मक्तेदार यात अंतर ठेवले पाहिजे.नेता आणि मक्तेदार यांची सरमिसळ करू नये.नक्कीच बदल जाणवेल.

मी अनेक झेडपी सदस्यांना भेटतो,ते मला भेटतात.पैकी आधिकतम मक्तेदार आहेत.झेडपी तून मक्तेदारी मिळवणे याच हेतूने ते निवडणूक लढवतात.लाखाचे काम बारा हजारात करतात.कधी कधी न करता पैसे उपटतात.संबधित जबाबदार आधिकारीला फिफ्टी फिफ्टी दिले कि कोणताही रस्ता न बनवता,तलाव न बांधता,शाळा न बांधता,संडास,मुतारी न बांधता फिफ्टी फिफ्टी पैसे मिळतात.शिवाय जो कमीशन देत नाही त्याला झेडपीच्या मक्तेदारी कामाचे बील मिळत नाही.म्हणून द्यावेच लागते.हे तर आजी माजी ग्रामविकासमंत्री सुद्धा जाणून आहेत.आपण तक्रार घेऊन जातो, तेंव्हा येड्याचे सोंग घेतात.बघू पाहू म्हणतात.आपल्यासमोर आधिकारीला फोन करीत नाहीत.आपण गेल्यानंतर फोन करतात.” तक्रार आली होती,जरा सांभाळून,हं! नाहीतर इडी लागायची मागे. ” माझ्यासमोर तरी एकाही मंत्रीने आधिकारीला दरडावल्याचे मी पाहिले नाही.सोक्षमोक्ष केल्याचा अनुभव आला नाही.आम्ही, तुम्ही तक्रार करून परत गेल्यानंतर हिशोब करतात.तुझे किती आणि माझे किती? आम्ही मंत्रीकडे तक्रार केल्यानंतर त्या मंत्रीचा फायदा होतो.आधिकारीने किती लोणी चोरले,ते आम्ही सांगतो.मंत्रीला कळते.झाला कि नाही मंत्रीचा फायदा!

आता झेडपी निवडणूक येत आहे.शेतकऱ्यांच्या , मजुरांच्या मुलांनी उमेदवारांना खडसावून विचारले पाहिजे,सांग तू माझ्या बापाला काय मदत केली? त्यावरून ठरवू , तुला मत द्यायचे कि नाही द्यायचे? आता आम्ही त्यालाच मतदान करू,ज्याचा राजकारण हा धंदा नाही.ज्याचे राजकारण ही फक्त सेवा आहे.जे शेतकरी,मजुर आणि सरकार मधील दुवा आहे.जो आमच्या बोंडअळीची नुकसानभरपाई साठी लढला,जो आमच्या घरकूल साठी लढला,जो आमच्या शौचालय अनुदानासाठी लढला,जो आमच्या विहीर अनुदानासाठी लढला,जो आमच्या कापसाच्या पैशांसाठी लढला,जो शेतकरीच्या विधवेला अनुदान मिळवण्यासाठी लढला.आम्हाला तुझी दारू नको.आम्हाला तुझे मटण नको.आम्हाला तुझे पांचशे रूपये नको.आधी पांच वर्षे शेतकऱ्यांसाठी,मजुरांसाठी काम कर.मग,ये मत मागायला.

…. शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.
जळगाव

(वरील लेखात नमूद केलेले विचार हे व्यक्तिगत लेखकाची आहेत,यास संपादकिय विभाग वा संपादक सहमत आहे असे नाही. कुणाला काही आक्षेप असल्यास लेखकाने दिलेल्या सम्पर्क क्रमांकावर लेखकांशी सम्पर्क करवा)

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Speed News Maharashtra

ह्या न्यूज पोर्टल च्या ब्यूरो चीफ ज्योतिबाला एस.एस. ह्या असून ब्युरो चीफ ( एच. आर.) पंकज सपकाळे हे आहेत सदर न्युज वेबपोर्टल हे मुबंई येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (मुबंई न्यायक्षेत्र) Mo. 9923149159

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे