धनूर येथील पुतळा प्रशासनाने सन्मानपूर्वक काढला ; गावात शांतता
कापडणे (करण ठाकरे) धुळे तालुक्यातील धनूर गावात विना परवानगीने बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा महसूल प्रशासनाने रविवारी पहाटे सन्मानपूर्वक काढला. या प्रकारानंतर धनूर गावात शांतता आहे.
गेल्या आठवड्यात धुळे तालुक्यातील धनूर गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा विना परवानगीने उभारण्यात आला होता. ही बाब लक्षात येताच पोलीस व महसूल प्रशासाने गावात धाव घेतली होती. मात्र, ग्रामस्थांनी पुतळ्यासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले होते. अखेर खासदार डॉ. सुभाष भामरे व आमदार कुणाल पाटील यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून पुतळा हटविणार नाही असे आश्वासन दिल्यानंतर गेल्या रविवारी आंदोलनाची सांगता झाली होती. दरम्यान, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने धनूरचे पोलीस पाटील व ग्रामसेविका यांना निलंबित केले होते, तर गावठाणहद्दीतील पुतळा काढण्यात यावा यासाठी महसूल प्रशासनाने ग्रामपंचायतीला नोटीस बजावली होती. ग्रामपंचायतीने पुतळा न काढल्याने अखेर रविवारी पहाटेच महसूल व पोलीस प्रशासनाचे पथक धनूर गावात पहाटे दाखल झाले. पहाटे तीन वाजेपासूनच पोलीस अधिकारी, सोबत रॅपिड अॅक्शन फोर्स,आरसीपी प्लाटून, एसआरपीचे पथकगावात दाखल होऊ लागले. धनूर गावात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर वाहने आडवे लावून गावात येणारे मार्ग बंद करण्यात आले होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा पुतळा सन्मानपूर्वक काढण्यात आला. त्यानंतर एका वाहनातून तो सोनगीर पोलीस स्टेशनला नेण्यात आला. धनूर गावात आता शांततेचे वातावरणअसल्याचे सांगण्यात आले.