सिंधुरत्न शाळेत सूर्यनमस्कार विक्रम
धुळे (करण ठाकरे) येथील सिंधुरत्न शाळेत शिक्षक व विद्यार्थ्यांनी सलग २१ दिवस सूर्यनमस्कार करीत ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प या उपक्रमात सहभाग नोंदवला. गीता परिवार, राष्ट्रीय योगासन क्रीडा महासंघ, पतंजली योगपीठ, क्रीडा भारती आणि हार्टफुलनेस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालयाकडून ७५ कोटी सूर्यनमस्कार संकल्प’ हा उपक्रम राबवला जात आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त या उपक्रमाचे आयोजन केले गेले आहे.
शरीर निरोगी व सक्षम व्हावे, यासाठी १ जानेवारीपासून २१ दिवस दररोज सूर्यनमस्कार करण्यात आले. शाळेतील २५० विद्यार्थी व शिक्षक उपक्रमात सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक खान, उपमुख्याध्यापिका शालिनी मंदाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थी, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सहभागी विद्यार्थी व शिक्षकांचे महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीचे माजी सदस्य व चेअरमन सुरेश कुंदनाणी, संस्थेचे अध्यक्ष तनुकुमार दुसेजा, सचिव राजुकुमार तोलाणी, सदस्य जमनू लखवाणी, जेठानंद हासवाणी यांनी प्रशस्तिपत्र देऊन अभिनंदन व कौतुक केले.