छत्रपती संभाजीनगर जिल्हात धक्कादायक घटना ! गर्भवती महिलेने उचललं टोकाचं पाऊल

छत्रपती संभाजीनगर: (गहिनीनाथ वाघ,विशेष प्रतिनिधी) माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे झालं आहे. मला आता सहन होत नाही. तुमचा स्वभाव कितीही प्रयत्न केले तरी तुमचा विश्वास नाही. माझी पण इज्जत आहे. माझा पण स्वाभिमान आहे. किती दिवस माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करायचा. खरंच खूप थकले मी असा मजकूर भिंतीवर लिहून पाच महिन्याच्या गर्भवती महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना पिसादेवी परिसरामध्ये घडली आहे. याप्रकरणी मयत महिलेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजली पांडुरंग शेरे असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी अंजली यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, अंजली यांचा पांडुरंग ज्ञानोबा शेरे राहणार सेलू तालुका परभणी यांच्यासोबत २०१८ साली विवाह झाला होता. अंजली यांना तीन वर्षाची मुलगी आहे. अंजली पाच महिन्याची गर्भवती होती. अंजलीला पती पांडुरंग घरगुती कारणावरून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. तसेच चरित्र्यावर संशय घेऊन वेळोवेळी अपमानित करत होता. दरम्यान २९ तारखेला अंजलीने आईला फोन करून सांगितले की, पांडुरंग म्हणत आहे की मुलगा झाला तर ठीक नाहीतर मी तुला सोडून दुसरे लग्न करेल अशी धमकी देत आहे. यामुळे मी आता जगणार नाही असं म्हणत तिने फोन कट केला.
त्यानंतर ३० तारखेला दुपारी बारा वाजेच्या सुमारास अंजलीने गळफास घेऊन आयुष्य संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी अंजलीने भिंतीवर मजकूर लिहिला. त्यामध्ये म्हटले की माझ्या सहन शक्तीच्या पलीकडे झालं आहे. मला आता सहन होत नाही. तुमचा स्वभाव कितीही प्रयत्न केले तरी तुमचा विश्वास नाही. माझी पण इज्जत आहे. माझा पण स्वाभिमान आहे. किती दिवस माझ्या आई-वडिलांचा अपमान सहन करायचा. खरंच खूप थकले मी असा मजकूर लिहिला होता. दरम्यान या प्रकरणी अंजलीच्या आईच्या तक्रारीवरून चिकलठाणा पोलीस ठाण्यामध्ये अंजलीचा पती पांडुरंग याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.