चालू वर्षातही कापसाचे दर तेजीतच राहणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतीक कापूस बाजार २०२२ मध्येही तेजीत राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेत कापूस वापर वाढण्याची शक्यता, पुरवठ्यातील समस्या, तेजी पाहून नफेखोरीसाठी होणारी गुंतवणूक आणि जगात उद्योगांचा वाढता कापूस वापर यामुळे दर तेजीत राहतील. तसेच कापड आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अमेरिका उद्योगाचा विस्तार करेल, असे अमेरिकेच्या नॅशनल काॅटन काऊंशीलने म्हटले आहे.
मागील वर्षात जागतीक अर्थव्यवस्थेत आणि कापूस बाजारात अनिश्चितता आणि अस्थिरता होती. मात्र कोरोनाचा विळखा सैल होत गेला तशी जागतीक अर्थव्यवस्था पुन्हा उभारी घेत आहे. मागील वर्षभरात कापसाला मोठी मागणी राहिली. त्यामुळे कापसाचे दर दशकातील उच्चांकी पातळीवर पोचले. मात्र जागतीक मार्केटवर अद्यापही कोरोना परिस्थितीचे पडसाद दिसतात. वाढलेला वाहतुक खर्च आणि मजुरांची टंचाई यामुळे जागतीक कापुस पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे, असे अमेरिकेच्या नॅशनल काॅटन काऊंशीलने म्हटले आहे.
अमेरिकेत २०२२ मध्ये १२० लाख हेक्टरवर कापूस लागवडीचा अंदाज आहे. मात्र प्रत्यक्ष कापूस काढणी ९८ लाख हेक्टरील होईल. तर १८.९ टक्के कापूस काढणी होणार नाही. अमेरिकेत कापूस उत्पादन १७३ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे. तर उत्पादकता ८५० पाऊंड प्रतिएकर राहिल. उत्पादनापैकी १६८ लाख गाठी सामान्य आणि ४ लाख ३८ हजार गाठी अतिरिक्त लांब धाग्याचा कापूस असेल, असेही काउंसीलने म्हटले आहे.
अमेरिकेतील कापड उद्योगाचा कापूस वापर २७ लाख टनांपर्यंत वाढेल, असेही नॅशनल काॅटन काऊंशीलने म्हटले आहे. अमेरिकेत आशियातील बाजारांतून मोठ्या प्रमाणात कापूस आयात (Cotton Import) होते. आयात कमी करण्यासाठी अमेरिकेला कापड उद्योगामध्ये मोठी गुंतवणूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे.