खंडणीखोर वैदू झाला गजाआड
जळगाव (प्रतिनिधी) रस्त्यावर तंबू ठोकून जडीबुटी विकणारा तसेच पीडीत रुग्णाला उपचाराच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या वैदूला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. सुरजसिंग राजुसिंग चितोडीया रा.केसर नगर भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या वैदूचे नाव आहे.
जडीबुटीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचार करण्याच्या नावाखाली या वैदूने रुग्णाकडून ३ लाख १२ हजार रुपये घेतले. शिवाय रुग्णाचे विवस्त्र फोटो काढुन १ लाख ६७ हजाराची ब्लॅकमेलिंग करुन खंडणीची मागणी केली. या प्रकरणी दाखल तक्रारीच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ युनुस शेख, पोहेकॉ अश्ररफ शेख, पोहेकॉ सुनिल दामोदरे, पोहेकॉ लक्ष्मण पाटील, पोना नंदलाल पाटील, पोना भगवान पाटील, पोना राहुल बैसाणे, पोकॉ सचिन महाजन तसेच टेक्नीकल विंग मधील हेकॉ संदीप सावळे, पोकॉ ईश्वर पाटील आदींनी या तपासाला सुरुवात केली.
पो.नि.किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे भडगाव तालुक्यातील पिडीतास ब्लॅकमेलिंग करणारा वैदू सुरजसिंग राजुसिंग चितोडीया (रा.केसरनगर भुसावळ) याला ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईकामी त्याला भडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध भडगाव पोलीस स्टेशनला गुरनं 298/21 भादवि कलम 384, 292, 420, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.